खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये चांगली तेजी दिसून येत आहे. IndusInd बँकेने प्री-क्वार्टर अपडेटमध्ये म्हटले आहे की 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत त्यांचे नेट ॲडव्हान्सेस वर्ष-दर-वर्षाच्या तुलनेत 19 टक्क्यांनी वाढून 2,71,966 कोटी रुपये झाले आहे. त्याच वेळी, वार्षिक आधारावर, नेट डिपॉझिट 14 टक्क्यांनी वाढून 3,25,491 कोटी रुपये झाल्या आहेत. दरम्यान, बुधवारी कामकाजादरम्यान इंडसइंड बँकेचा शेअर 1.45 टक्क्यांनी घसरून 1222.75 रुपयांवर बंद झाला.
विदेशी ब्रोकरेज हाऊस जेफरीजने बँकिंग स्टॉक इंडसइंड बँकेला बाय रेटिंग दिले आहे. जेफरीजने इंडसइंड बँकेच्या शेअर्सवर 1600 रुपयांचे टार्गेट ठेवले आहे. ब्रोकरेज हाऊसने ठेवलेल्या टार्गेटनुसार बँकेच्या शेअरमध्ये बुधवारच्या बंद पातळीपासून 23 टक्क्यांची वाढ होऊ शकते. आपल्या नोटमध्ये, जेफरीजने म्हटले आहे की इंडसइंड बँक या क्षेत्रातील टॉप स्टॉक आहे. बँकेची लोन ग्रोथ हेल्दी राहिलीये, तसेच तिमाही आधारावर 4.6 टक्के आणि वार्षिक आधारावर 4.9 टक्क्यांनी वाढलीदेखील आहे.
6 महिन्यांत 49 टक्क्यांची वाढ
गेल्या 6 महिन्यांत इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये 49 टक्क्यांची वाढ झालीये. 5 जुलै 2022 रोजी खाजगी क्षेत्रातील बँकेचे शेअर्स 823.95 रुपयांच्या पातळीवर होते. बीएसईवर 4 जानेवारी 2023 रोजी बँकेचे शेअर्स 1222.75 रुपयांवर बंद झाले. इंडसइंड बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 1275.25 रुपये आहे. त्याच वेळी, बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 763.75 रुपये आहे. इंडसइंड बँकेचे मार्केट कॅप 94,813 कोटी रुपये असून जुलै-सप्टेंबर 2022 तिमाहीत बँकेचा महसूल 8708.03 कोटी रुपये होता. त्याच वेळी, सप्टेंबर तिमाहीत बँकेला 1786.72 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
(टीप - या लेखात केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती दिली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)