Join us  

शेअर मार्केट गडगडलं! एका रिपोर्टमुळे अदानी गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 3:15 PM

आज शेअर बाजारातील गुंतवणुकदारांचे ८ लाख कोटींहून अधिक रुपये बाजारातील विक्रीमुळे बुडाले आहेत.

मुंबई - अदानी ग्रुपबाबत हिडनबर्ग रिसर्चच्या एका रिपोर्टमुळे शेअर मार्केटमध्ये खळबळ माजली. अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये २५ टक्क्यांपर्यंत मोठी घसरण झाली आहे. गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांपासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने विक्री सुरू आहे. या विक्रीमुळे समूहाच्या गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटींहून अधिक रुपये बुडाले आहेत. या घसरणीचा परिणाम एकूण बाजारावरही स्पष्टपणे दिसून येत आहे. सेन्सेक्स ११०० हून अधिक अंकांनी घसरला असून तो ५९ हजारांच्या वरच राहिला आहे. तर निफ्टी १७५५० च्या खाली आला आहे. त्यामुळे आज शेअर बाजारातील गुंतवणुकदारांचे ८ लाख कोटींहून अधिक रुपये बुडाले आहेत.

अदानी एंटरप्रायझेसच्या FPO च्या किमती घटल्या अदानी एंटरप्रायझेसचा शेअर आज २० टक्क्यांनी घसरून २७२१ रुपयांवर पोहोचला. आज अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओही उघडला. २० हजार कोटींच्या या एफपीओची किंमत ३११२-३२७६ रुपये निश्चित करण्यात आला आहे. यातून शेअरच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. दुपारी २.२० वाजता अदानी टोटल गॅस २० टक्क्यांनी घसरून २९२८ रुपयांच्या पातळीवर आला.

Adani Green Energy २० टक्के घसरण होत १४८६ रुपयांच्या पातळीवर आहे. हा ५२ आठवड्यांचा नवा नीचांक आहे. अदानी ट्रान्समिशन रु. २०१४ वर २० टक्क्यांनी घसरले आहे. ५२ आठवड्यांचा नीचांक रु.१८१० आहे. Adani Ports शेअरर्स २५ टक्क्यांनी घसरले. अदानी पॉवर ५ टक्क्यांनी घसरले आणि रु.२४८ दरावर पोहचले आहे. अदानी विल्मार ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटसह ५१६ वर आहे.

ACC, अंबुजा, NDTV २५% घसरण अदानी समूहाने अंबुजा सिमेंट, एसीसी सिमेंट आणि एनडीटीव्हीही विकत घेतले आहेत. या समभागांमध्येही विक्री होत आहे. ACC १५ टक्क्यांच्या घसरणीसह १८५० च्या खाली आहे. अंबुजा सिमेंट्सचे दर २५ टक्क्यांनी घसरले आहेत. ते ३४५ रुपयांपर्यंत पोहचले आहेत. NDTV ५ टक्क्यांच्या घसरणीसह २५६ रुपयांच्या पातळीवर आहे.

श्रीमंतांच्या यादीत अदानी सातव्या क्रमांकावरअदानी कंपनीच्या शेअर्सच्या जोरदार घसरणीचा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या नेटवर्थवरही वाईट परिणाम झाला आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीश निर्देशांकात सध्या चौथ्या स्थानावर असलेले गौतम अदानी अचानक सातव्या क्रमांकावर घसरले आहेत. २०२२मध्ये जगातील टॉप-१० अब्जाधीशांमध्ये गौतम अदानी हे सर्वाधिक कमाई करणारे उद्योगपती होते. जगातील श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्यात देखील गौतम अदानी यशस्वी झाले होते. मात्र २०२३ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गौतम अदानी यांना धक्का बसला आहे. अदानी समूहाचे मार्केट कॅप अवघ्या दोन दिवसांत २.३७ लाख कोटी रुपयांनी घटले आहे. यामुळे गौतम अदानी यांची एकूण संपत्तीही $१००.४ अब्जावर आली आहे.  

टॅग्स :शेअर बाजारअदानी