Join us

शेअर बाजार जोरदार आपटला; सेन्सेक्समध्ये ७०० अंकांची घसरण, टेक-आयटी शेअर्समध्ये मोठी विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 9:39 AM

Share Market Opening 4 September: देशांतर्गत शेअर बाजारासाठी बुधवारचा दिवस वाईट ठरण्याची शक्यता आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण दिसून आली. आजच्या व्यवहारात सकाळपासूनच आयटी आणि टेक शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून येतेय.

Share Market Opening 4 September: देशांतर्गत शेअर बाजारासाठी बुधवारचा दिवस वाईट ठरण्याची शक्यता आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण दिसून आली. आजच्या व्यवहारात सकाळपासूनच आयटी आणि टेक शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून येतेय.सकाळी सव्वानऊ वाजता सेन्सेक्स ७०० अंकांच्या घसरणीसह उघडला. निफ्टीनेही जवळपास २०० अंकांच्या घसरणीसह सुरुवात केली. त्यानंतर सकाळी ९ वाजून २२ मिनिटांनी सेन्सेक्स ५५० अंकांनी घसरून ८२ हजार अंकांच्या वर व्यवहार करत होता. तर एनएसईचा निफ्टी ५० निर्देशांक जवळपास 170 अंकांच्या घसरणीसह २५,११० वर व्यवहार करत होता.

प्री-ओपन सेशनमध्येच अंदाज

प्री-ओपन सेशनमध्येच आज बाजारात प्रचंड घसरण होण्याची चिन्हे दिसत होती. प्री-ओपन सेशनमध्ये सेन्सेक्स ७०० अंकांनी घसरून ८२ हजार अंकांच्या खाली आला, तर निफ्टी जवळपास १९० अंकांनी घसरून २५,०९० अंकांच्या खाली आला. निफ्टीचा फ्युचर्स सुमारे १६० अंकांच्या डिस्काऊंटसह २५,१८५ अंकांच्या जवळ आला होता.

काल बाजार सपाट फ्लॅट

मंगळवारी देशांतर्गत बाजार कामकाजाच्या अखेरिस जवळपास फ्लॅट बंद झाला. कालच्या व्यवहारात सेन्सेक्स ४.४१ अंकांच्या घसरणीसह ८२,५५५.४४ अंकांवर बंद झाला. व्यवहार संपल्यानंतर निफ्टी १.१५ अंकांच्या किरकोळ वाढीसह २५,२७९.८५ अंकांवर बंद झाला. त्याआधी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजाराने नवा उच्चांक गाठला. सेन्सेक्सनं ८२,७२५.२८ अंकांचा नवा उच्चांक गाठला तर निफ्टीनं २५,३३३.६५ अंकांचा नवा उच्चांक गाठला.

कामगार दिनानिमित्त सोमवारी अमेरिकन बाजारात सुट्टी होती. त्यानंतर मंगळवारी व्यवसाय सुरू झाला तेव्हा वॉल स्ट्रीटमध्ये मोठी विक्री दिसून आली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेजमध्ये १.५१ टक्क्यांची घसरण झाली. एस अँड पी ५०० निर्देशांक २.१२ टक्क्यांनी तर तंत्रज्ञान केंद्रित निर्देशांक नॅसडॅक ३.२६ टक्क्यांनी घसरला.

अमेरिकी बाजारातील घसरणीचा परिणाम आज आशियाई बाजारावरही दिसून येत असून सकाळपासूनच जोरदार विक्री सुरू आहे. जपानचा निक्केई निर्देशांक 4 टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार करत होता. टॉपिक्स निर्देशांक २.७४ टक्क्यांनी घसरला. दक्षिण कोरियाचा कोस्पी २.६१ टक्के तर कॉस्डॅक २.९४ टक्क्यांनी घसरला आहे. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांकही आज खराब सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत.

जवळपास सर्वच मोठे शेअर्स घसरले

सेन्सेक्सचे बहुतांश शेअर्स सुरुवातीच्या व्यवहारात घसरणीसह व्यवहार करत आहेत. एशियन पेंट्स, सन फार्मा आणि बजाज फिनसर्व्ह हे तीनच शेअर्स ग्रीन झोनमध्ये व्यवहार करत होते. टेक महिंद्रा, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि टीसीएस या आयटी कंपन्यांचे शेअर्स १.२५ टक्क्यांपर्यंत घसरले. जेएसडब्ल्यू स्टीलचे समभाग सर्वाधिक २ टक्क्यांनी घसरले. एल अँड टी, टाटा स्टील, एनटीपीसी, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, टायटन, अॅक्सिस बँक, एसबीआय या कंपन्यांचे शेअर्स एक-एक टक्क्यांनी घसरले.

टॅग्स :शेअर बाजार