Sebi On Small - Mid Cap Stocks: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येतेय. प्रामुख्यानं मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये ही घसरण दिसून आली. यावर बोलताना स्मॉल आणि मिडकॅप शेअर्समध्ये नुकत्याच झालेल्या घसरणीवर भांडवली बाजार नियामकानं भाष्य करण्याची गरज नाही, असं मत सेबीचे अध्यक्ष माधबी पुरी बुच यांनी शुक्रवारी व्यक्त केलं. या वर्षी मार्चमध्ये याच शेअर्सच्या उच्च मूल्यांकनाबाबत केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत बुच यांनी, जेव्हा सेबीला याची गरज वाटली, तेव्हा त्यांनी उच्च मूल्यांकनाबद्दल चिंता व्यक्त केल्याचं म्हटलं.
काय म्हणाल्या बुच?
"मिड कॅप आणि स्मॉल कॅपबाबत मला वाटतं की, एक वेळ अशी आली जेव्हा नियामकाला त्यावर भाष्य करण्याची गरज वाटली. आज नियामकाला अतिरिक्त भाष्य करण्याची गरज वाटत नाही," असं बुच म्हणाल्या. मार्च २०२४ मध्ये नियामकाच्या एका टिप्पणीत, बुच यांनी दोन्ही विभागांमधील उच्च मूल्यांकनाबद्दल चिंता व्यक्त केली होती.
शेअर्समध्ये सातत्याने घसरण
स्मॉल आणि मिडकॅप शेअर्स मंदीच्या अवस्थेत आहेत. काही शेअर्समध्ये सलग २० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. दरम्यान, फंड हाऊसेससाठी नुकतीच सुरू करण्यात आलेली २५० रुपयांची एसआयपी स्कीम बंधनकारक करण्याचा नियामकाचा कोणताही हेतू नाही, असंही माधबी पुरी बुच यांनी स्पष्ट केलं.
आज कामकाजादरम्यान सेन्सेक्सच्या ३० शेअर्समधील महिंद्रा अँड महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, मारुती आणि सन फार्मा यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले. दुसरीकडे झोमॅटो, टाटा स्टील, एनटीपीसी आणि लार्सन अँड टुब्रोचे समभाग सर्वाधिक वधारले.