कोळंबी व्यवसायाशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसत आहे. या व्यवसायाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स बुधवारी 20 टक्क्यांपर्यंत वधारले. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या मोठ्या घोषणेनंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ही तेजी दिसत आहे. अवंती फीड्स, वॉटरबेस लिमिटेड, एपेक्स फ्रोझन फूड्स, झील अॅक्वा आणि मुक्का प्रोटीन्सचे शेअर्स बुधवारी 20% पर्यंत वधारले आहेत. गेल्या काही वर्षांत अवंती फीड्सच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांन तब्बल 61000% पेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. या कालावधीत अवंती फीडचा शेअर 1 रुपयांवरून 750 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
1 रुपयांवरून 750 रुपयांवर पोहोचला अवंती फीड्सचा शेअर -
गेल्या 15 वर्षांत अवंती फीड्स या कोळंबी व्यवसायाशी संबंधित कंपनीचा शेअर 61000% पेक्षाही अधिक वधारला आहे. कंपनीचा शेअर्स 31 जुलै 2009 रोजी १.२३ रुपयांवर होते. तो 24 जुलै 2024 रोजी सुमारे 17% पेक्षा अधिकच्या वाढीसह 756 रुपयांवर पोहोचला. गेल्या एका वर्षात अवंती फीड्सचा शेअर 90% पेक्षा अधिक वधारला आहे. तसेच गेल्या पाच दिवसांत हा शेअर 25% हून अधिकने वधारला आहे.
सीफूड इंडस्ट्रीशी संबंधित वॉटरबेस लिमिटेड कंपनीचा शेअरही बुधवारी 20 टक्क्यांच्या तेजीसह 102.18 रुपयांवर पोहोचला. तर, एपेक्स फ्रोजन फूड्स लिमिटेडचा शेअरही 20 टक्क्यांच्या वाढीसह 311.75 रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअरने बुधवारी 52 आठवड्यांचा आपला नवा उच्चांक बनवला आहे. याशिवाय, झील अॅक्वाचा शेअरही 10 टक्क्यांच्या वाढीसह 15.35 रुपयांवर पोहचला आहे.
अर्थसंकल्पात अशी घोषणा -
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2024 च्या भाषणात म्हटले आहे की, केंद्र सरकार कोळंबीच्या शेतीसाठी वित्तपुरवठा करेल. कोळंबीच्या वाढीसाठी न्यूक्लियस ब्रिडिंग सेंटर्सचे नेटवर्क तयार करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल. याशिवाय, कोळंबीची शेती, प्रक्रिया आणि निर्यातीसाठी नाबार्डच्या माध्यमातून वित्तपुरवठा केला जाईल, असेही सीतारमन यांनी म्हटले आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)