एल्सिड इन्व्हेस्टमेंट्सचा (Elcid Investments Share) शेअर सातत्याने चर्चेत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये आज सोमवारी जबरदस्त वाढ दिसून आली. या शेअरला आज 5% चे अप्पर सर्किट लागले आणि तो 282631.30 रुपयांच्या इंट्राडे हायवर पोहोचला. यापूर्वी गेल्या शुक्रवारी हा शेअर 269172.70 रुपयांवर बंद झाला होता. अर्थात या शेअरमध्ये एका दिवसात 13,458 रुपयांची वाढ झाली आहे.
गेल्या 29 ऑक्टोबरपासून एक आठवडा या शेअरमध्ये सातत्याने वाढ झाली. या कालावधीत हा शेअर 3,32,399.95 रुपयांच्या 52 आठवड्यांची उच्चांकी पातळीवर पोहोचला. यानंतर, गेल्या आठवड्यात या शेअरमध्ये सलग चार सत्रांमध्ये 5% चे लोअर सर्किट लागले होते. या काळात हा शेअर सुमारे 70,000 रुपयांपर्यंत घसरला होता.
सप्टेंबर तिमाहीचा निकाल -
Elcid Investments च्या शेअरने गेल्या आठवड्यात सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ₹43.47 कोटी होता, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 179.37% अधिक आहे. कंपनीचा महसूल 149.62% ने वाढून ₹56.34 कोटी झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने ₹15.56 कोटी निव्वळ नफा आणि ₹22.57 कोटी कमाई केली होती. या तिमाहीत कंपनीचे डिविडेंड उत्पन्न 19.47% ने वाढून ₹2.27 कोटी झाले आहे. त्याचे व्याज उत्पन्न 57.35% ने वाढून ₹7.27 लाख झाले.
एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ही एक गुंतवणूक कंपनी आहे. ती भारतीय रिझर्व्ह बँकेसोबत (RBI) रजिस्टर्ड एक गैर-बैंकिंग वित्तीय कंपनी (NBFC) म्हणून काम करते. एल्सिडकडे एशियन पेंट्सची 2.83% एवढी हिस्सेदारी आहे. एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा शेअर 29 ऑक्टोबरला 2,36250 रुपयांपर्यंत पोहोचला होता. शेअरची लिस्टिंग किंमत 2,25,000 रुपये होती. स्पेशल कॉल लिलावापूर्वी, 21 जून 2024 रोजी हा शेअर BSE वर 3.53 रुपयांवर बंद झाला होता.