Join us

बंपर नफ्यानंतर तेजीनं पळतोय डिफेन्स कंपनीचा हा शेअर, गुंतवणूकदारांना १६० टक्क्यांचा रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 1:32 PM

संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील जहाज बांधणी कंपनीनं गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.

गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील जहाज बांधणी कंपनीनं गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना एका वर्षात १६० टक्क्यांचा बंपर परतावा मिळाला. गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेडनं (GRSE) सातत्यानं गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली. कंपनीचे शेअर्स २९ ऑगस्ट २०२२ रोजी २९९.९५ रुपयांवरून २९ ऑगस्ट २०२३ रोजी ७९१.८० रुपयांपर्यंत वाढले आहेत. एक वर्षाच्या होल्डिंग कालावधीत यात १६४ टक्क्यांपेक्षा अधिकची वाढ झाली.

एखाद्या गुंतवणूकदारानं वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते तर त्याचं मूल्य आज २.६४ लाख झालं असतं. कंपनीच्या नफ्याबद्दल सांगायचं झाल्यास नुकत्याच संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या एकत्रित आधारावर निव्वळ नफ्यात ५२.८३ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. ३० जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफा ५०.१७ कोटी रुपयांवरून वाढून ७६.६८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, कंपनीचं एकूण उत्पन्न ३०.३८ टक्क्यांनी वाढून ७५५.९० कोटी रुपये झालं आहे.

जीआरएसई आणि डेम्पो ग्रुपनं तीन प्रमुख शिपयार्डमध्ये व्यावसायिक जहाजांच्या बांधकामासाठी कोलॅबरेशन मॉडेल सुरू करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. जीआरएसई ही एक शिपयार्ड कंपनी आहे, जी भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजबांधणीच्या गरजा पूर्ण करते.

शेअर्सची कामगिरीगार्डन रीच शिपबिल्डर्स आणि इंजिनिअर्सचे शेअर्स आज ८१४.९५ वर उघडले. शेअरचा आजचा उच्चांकी आणि नीचांकी स्तर ८१४.९५ रुपये आणि ७८८.९५ रुपये आहे. बातमी लिहिस्तोवर हा शेअर ७८९ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. (टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक