टाटा समूहाच्या कंपन्यांपैकी टाटा मोटर्स ही अशी कंपनी आहे ज्याचा सध्या बोलबाला आहे. कंपनीच्या शेअर्सनंही सध्या तेजी पकडली आहे. कंपनीचे शेअर्स जवळपास २ टक्क्यांच्या तेजीसह ५४५.५० रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहे. दरम्यान, कंपनीचा गुजरात सरकारसोबत झालेल्या करारामुळे ही तेजी दिसून येत आहे. टाटा मोटर्सनं शुक्रवारी गुजरातच्या विजय रुपाणी सरकारसोबत लिथियम-आयन सेल प्रकल्प उभारण्यासाठी करार केला. या गुंतवणुकीचं मूल्य १३ हजार कोटी रुपये असेल. भारत आपली स्वत:ची इलेक्ट्रीक व्हेईकल सप्लाय चेन तयार करण्याचे प्रयत्न करत आहे.
टाटा मोटर्सचा गुजरातमधील साणंद येथे एक प्रकल्प कार्यरत आहे. याशिवाय कंपनीनं फोर्ड मोटर्सच्या प्रकल्पाचंही अधिग्रहण केलंय. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार दोन्ही कंपन्यांचा हा करार पूर्णत्वाकडे जाण्यास अजून काही कालावधी लागू शकतो. अशा सर्व अपडेट्समुळे टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये उसळी दिसून येत आहे. कंपनीचे शेअर्सनं फेब्रुवारी २०१७ च्या पातळीला पार केलंय.
यावर्षी आतापर्यंत टाटा मोटर्सच्या शेअर्सच्या किंमतीत ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे . या कालावधीत बीएसई सेन्सेक्समध्ये केवळ २.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांसाठी चांगली गोष्ट म्हणजे गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरच्या किमतीत १४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)