Tata Group Stock : आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर फर्टिलायझर स्टॉक्स पुन्हा सक्रिय झाले आहेत. सरकारने करकपातीची घोषणा करेल ज्यामुळे मागणी वाढेल, अशी बाजाराची अपेक्षा आहे. फर्टिलायझर स्टॉक्स वाढत असताना आम्ही तुम्हाला टाटा समूहाच्या या क्षेत्रातील एका हिडन जेमविषयी सांगणार आहोत. हा शेअर टाटा समूहाचा भाग असून त्याची किंमत ४०० रुपयांपेक्षा कमी आहे.
टाटाच्या हिडन जेम असलेल्या फर्टिलायझर स्टॉकचं नाव रॅलिस इंडिया (Rallis India Ltd) असं आहे. रॅलिस इंडिया ही १५० वर्षांहून अधिक इतिहास असलेली केमिकल कंपनी आहे. शेतीविषयक समज, शेतकऱ्यांशी सातत्यानं संवाद आणि दर्जेदार कृषी रसायनांसाठी ही कंपनी ओळखली जाते. कृषी रसायनं तयार करण्याबरोबरच बियाणं आणि सेंद्रिय वनस्पतींच्या वाढीच्या पोषक द्रव्यांचा ही व्यवसाय करते.
शेअरची कामगिरी कशी?
रॅलिस इंडिया हा टाटाचा शेअर आहे. गुरुवारी रॅलिस इंडिया लिमिटेडचा शेअर ३.६६ टक्क्यांनी वधारून ३४० रुपयांवर बंद झाला. या काळात कंपनीच्या सुमारे ३५ लाख शेअर्सचे व्यवहार झाले. रॅलिस इंडिया हा स्मॉलकॅप शेअर असून त्याचे बाजार भांडवल ६,६३१.३९ कोटी रुपये आहे. दरम्यान, शुक्रवारीही या कंपनीच्या शेअरमध्ये सुरुवातीच्या कामकाजात खरेदी दिसून आली.
अवघ्या दोन आठवड्यांत रॅलिस इंडियाच्या शेअरमध्ये २८ टक्क्यांची वाढ झाली आहे. YTD तत्त्वावर या टाटा कंपनीच्या शेअरमध्ये ३५ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात स्मॉलकॅप शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना ७५ टक्क्यांचा जबरदस्त परतावा दिला आहे. गेल्या दोन वर्षांत हा शेअर ८३ टक्क्यांनी वधारला असला, तरी गेल्या तीन वर्षांत तो स्थिर आहे. गेल्या पाच वर्षांत रॅलिस इंडियाच्या शेअरनं आपल्या गुंतवणूकदारांना १३१ टक्क्यांचा रिटर्न दिलाय.
जूनमध्ये लाभांश
बीएसईच्या वेबसाइटनुसार, रॅलिस इंडियानं जून २०२४ मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर २.५० रुपये लाभांश दिला. २०२३ मध्ये टाटा कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना २.५० रुपयांचा कॅश रिवॉर्ड दिला. २०२२ आणि २०२१ मध्ये कंपनीने प्रत्येक वर्षी प्रति शेअर ३ रुपये लाभांश दिला होता. २०२० मध्ये टाटा समूहाने आपल्या भागधारकांना २.५० रुपयांचा लाभांश वितरित केला.
३१ मार्च २०२४ पर्यंत कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, प्रवर्तकांचा रॅलिस इंडियामध्ये ५५.०८ टक्के हिस्सा आहे. तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा (२२.५३ टक्के), म्युच्युअल फंड (११.९२ टक्के), एफआयआय (९.२१ टक्के), इतर डीआयआय (१.११ टक्के) आणि विमा कंपन्या (०.१५ टक्के) यांचा समावेश आहे.
(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारती गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)