जगातील सर्वच अर्थव्यवस्थांना महागाईची झळ बसत आहे. यामुळे जगभर मंदीची लाट येण्याची शक्यता असल्याने शेअर बाजारात मागील सप्ताहात घसरण झाली. या आठवड्यात अमेरिकेच्या फेडरल बँकेची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, या निर्णयाकडे बाजाराचे लक्ष असल्यामुळे आगामी सप्ताह अस्थिरतेचा राहण्याची शक्यता आहे.
गत सप्ताहात बाजारावर विक्रीचे मोठे दडपण आले होते. महागाईतील वाढ आणि फीच या संस्थेने भारताच्या वाढीचा कमी केलेला अंदाज यामुळे गुंतवणूकदार धास्तावले. त्यांनी बाजारातून नफा कमवून घेण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे सप्ताहाच्या अखेरीस बाजारात मोठी घसरण दिसून येऊन मागील सप्ताहात मिळालेली वाढ पूर्णपणे वाहून गेली.
गुंतवणूकदार का झाले सावध?वाढत्या चलनवाढीमुळे व्याजदरात वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सावधपणे व्यवहार करताना दिसत आहेत. परकीय वित्त संस्थांनीही गत सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये विक्रीचा मार्ग अवलंबून नफा कमविला आहे. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना मंदीचा मोठा फटका बसण्याची भीती आहे.
६ कंपन्यांचे २ लाख कोटींचे नुकसानगेल्या आठवड्यात १० प्रमुख कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे बाजार भांडवल २,००,२८०.७५ कोटींनी कमी झाले. यात सर्वाधिक नुकसान हे टीसीएस आणि इन्फोसिस यांचे झाले आहे. रिलायन्स, टीसीएस, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस आणि एचडीएफसी यांनाही मोठा फटका बसला.