Trading Account KYC Update: तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही तुमच्या ट्रेडिंग खात्याचे केवायसी तपशील (Know Your Customer) १८ ऑगस्ट २०२३ रोजी म्हणजेच आज अपडेट न केल्यास तुमचं खातं बंद केलं जाईल. ब्रोकिंग कंपन्या गुंतवणूकदारांना त्यांची खात्याची माहिती आणि केवायसी तपशील जुळवून अपडेट करण्याचं आवाहन करत आहेत.
का आवश्यक आहे केवायसी?
बाजार नियामक सेबीच्या म्हणण्यानुसार गुंतवणूकदारांचा डेटा अप टू डेट असला पाहिजे. अशा परिस्थितीत ब्रोकर्सनी गुंतवणूकदारांचा अचूक डेटा राखणं आवश्यक आहे. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) केवायसी गाइडलाइन्सनुसार जर एखाद्या ग्राहकाचे तपशील अपडेट केले गेले नाहीत, तर त्याकडे नॉन-कम्प्यायंट म्हणून पाहिलं जाईल आणि त्या खात्यावर व्यापार करण्याची परवानगी दिली जाणार नाही. स्मूथ सेटलमेंटसाठी, गुंतवणूकदारांनी त्यांचे ट्रेडिंग आणि डीमॅट दोन्ही खाती केवायसी तपशीलांसह अपडेट करणे आवश्यक असल्याचे एनएसईनं म्हटलेय.
कोणती माहिती होणार अपडेट
ट्रेडिंग खात्यासाठी, तुम्हाला तुमचे सहा डिटेल्स अपडेट करावे लागतील. नाव, पूर्ण पत्ता, पॅन, मोबाईल नंबर, ईमेल-आयडी, इन्कम स्लॅब आणि कस्टोडियन सेटल क्लायंटसाठी कस्टोडियनचे तपशील. हे तपशील अपडेट करणे बंधनकारक आहे. गुंतवणूकदारांसाठी केवायसी करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. याद्वारे ब्रोकर/सल्लागार क्लायंटच्या आयडीची पडताळणी करू शकतात आणि सिस्टममध्ये पारदर्शकता राखली जाते.