Share Market: गेल्या आठवड्यात शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. याचा परिणाम बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये सूचीबद्ध टॉप-10 कंपन्यांच्या मार्केट कॅपवरही दिसून आला. या तेजीत नऊ कंपन्यांचे बाजारमूल्य वाढले, तर एका कंपनीचे घटले. या कालावधीत, टाटा समूहातील आयटी कंपनी TCS च्या शेअर्स होलडर्सची सर्वाधिक कमाई झाली. त्यांनी एका आठवड्यात 57,000 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.
नऊ कंपन्यांचे मार्केट कॅप वाढले
गेल्या आठवड्यात बीएसईवर सूचीबद्ध टॉप-10 कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांच्या बाजार भांडवलात जोरदार वाढ झाली. एकूण मार्केट कॅपमध्ये 1,80,788.99 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. शेअर बाजारात सुरू असलेल्या तेजीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहार दिवशी, बाजार निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी सलग 11 व्या सत्रात तेजीसह बंद झाले. शुक्रवारी सेन्सेक्स 319.63 अंकांच्या किंवा 0.47 टक्क्यांच्या वाढीसह 67,838.63 अंकांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला.
या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांची चांदी
गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1,239.72 अंकांनी किंवा 1.86 टक्क्यांनी वाढला. या कालावधीत, टाटा समूहाची कंपनी TCS आपल्या गुंतवणूकदारांना कमाई करुन देणाच्या बाबतीत आघाडीवर राहिली. मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, आयटीसी, भारती एअरटेल, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स, यांनीही आपल्या गुंतवणूकदारांसाठी भरपूर पैसा कमावला. याउलट, हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) च्या गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा ागला.
टीसीएसच्या शेअर होलडर्सचा सर्वाधिक नफा
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे बाजार भांडवल 12,59,902.86 कोटी रुपयांवरून 13,17,203.61 कोटी रुपयांपर्यंत वाढले. यानुसार, एका आठवड्यात TCS भागधारकांच्या संपत्तीत 57,300.75 कोटी रुपयांची वाढ झाली. एचडीएफसी बँक, यात दुसऱ्या नंबरवर राहिली. कंपनीचे मार्केट कॅप (HDFC MCap) रु. 28,974.82 कोटींनी वाढून रु. 12,58,989.87 कोटी झाले.
या कंपन्यांचे गुंतवणूकदार नफ्यात
टीसीएस आणि एचडीएफसी बँक व्यतिरिक्त दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज भारती एअरटेलचा एमकॅप रु. 28,354.73 कोटींनी वाढून रु. 5,23,723.56 कोटींवर पोहोचला, तर इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांनी या कालावधीत रु. 17,680.53 कोटी कमावले आहेत आणि कंपनीचे मार्केट कॅप 27,637.87 कोटींवर पोहचला. ICICI बँकेचे मार्केट कॅप 15,364.55 कोटी रुपयांनी वाढून 6,94,844.51 कोटी रुपयांवर पोहोचले.
या यादीतील पुढील नाव स्टेट बँक ऑफ इंडिया चे आहे, ज्याचे बाजार मूल्य 13,342.3 कोटी रुपयांनी वाढून 5,34,048.78 कोटी रुपये झाले. मुकेश अंबानींच्या रिलायन्सचे मूल्यांकन 7,442.79 कोटी रुपयांनी वाढून 16,64,377.02 कोटी रुपयांवर पोहोचले. ITC चे मार्केट कॅप 7,232.74 कोटी रुपयांच्या वाढीसह 5,59,165.44 कोटी रुपयांवर पोहोचले, तर बजाज फायनान्सचे मार्केट कॅप 5,095.78 कोटी रुपयांच्या वाढीसह 4,54,039.37 कोटी रुपयांवर पोहोचले.
(टीप- आम्ही शेअरच्या कामकिरीविषयी माहिती देत आहोत. बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या आधीन आहे. शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)