Share Market: इस्रायल-हमास (Israel-Hamas War) युद्धामुळे जगभरातील बाजारांवर मोठा प्रभाव पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजाराबद्दल बोलायचे झाले तर, सलग दुसऱ्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. सेन्सेक्समध्ये लिस्टेड कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात गेल्या आठवड्यात 1.93 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. यात TCS च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले.
गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 1,614.82 अंकांनी किंवा 2.46 टक्क्यांनी घसरला. या दरम्यान टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे बाजार भांडवल 12,25,983.46 कोटी रुपयांवर आले. TCS गुंतवणूकदारांनी एका आठवड्यात 52,580.57 कोटी रुपयांची मालमत्ता गमावली. कंपनीचे मार्केट कॅप 27,827.08 कोटी रुपयांनी घसरुन 12,78,564.03 कोटी रुपयांवर आले आहे.
एचडीएफसी-रिलायन्सलाही तोटा
TCS नंतर मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर होल्डर्सनाही सर्वात जास्त नुकसान सोसावे लागले आहे. HDFC बँकेचे मार्केट कॅप 40,562.71 कोटींनी घसरुन 11,14,185.78 कोटी झाले, तर RIL MCap 22,935.65 कोटींनी घसरुन 15,32,595.88 कोटी झाले.
इतर कंपन्यांनाही मोठा फटका
सेन्सेक्सवर लिस्टेड सर्व 10 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली आहे. यामध्ये इन्फोसिसचे मार्केट कॅप 19,320.04 कोटी रुपयांनी घसरून 5,73,022.78 कोटी रुपयांवर आले, तर भारती एअरटेलचे 5,13,735.07 तोट्यासह 17,161.01 कोटी रुपयांवर आले. याशिवाय, बजाज फायनान्स एमसीकॅप 15,759.95 कोटी रुपयांनी घसरून 4,54,814.95 कोटी रुपयांवर आले, तर आयसीआयसीआय बँक एमसीकॅप 13,827.73 कोटी रुपयांनी घसरून 6,39,292.94 कोटी रुपयांवर आले.
(टीप: आम्ही फक्त शेअरच्या कामगिरीविषयी माहिती दिली आहे. शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)