Join us  

TATA Motors DVR च्या शेअर्सचं ट्रेडिंग झालं बंद; जाणून घ्या गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 3:48 PM

Tata Motors DVR : शेअर बाजारात टाटा मोटर्स डीव्हीआरच्या शेअर्सचं ट्रेडिंग बंद करण्यात आलंय. टाटा मोटर्सनं मंगळवारी आपल्या डिफरन्शियल व्होटिंग राइट्स (डीव्हीआर) शेअर्सचे व्यवहार बंद करण्याची घोषणा केली.

शेअर बाजारातटाटा मोटर्स डीव्हीआरच्या (Tata Motors DVR) शेअर्सचं ट्रेडिंग बंद करण्यात आलंय. टाटा मोटर्सनं मंगळवारी आपल्या डिफरन्शियल व्होटिंग राइट्स (डीव्हीआर) शेअर्सचे व्यवहार बंद करण्याची घोषणा केली. कंपनी आपल्या डीव्हीआर शेअर्सचे रूपांतर सामान्य शेअर्समध्ये करत आहे. कंपनीनं डीव्हीआर शेअर्स रद्द करून त्याजागी सामान्य शेअर्स आणण्याची योजना आखली होती. टाटा मोटर्सचे डीव्हीआर शेअर्स २००८ पासून लिस्टेड आहेत.

१० डिव्हीआर शेअर्समागे मिळणार ७ शेअर्स

टाटा मोटर्सच्या प्रत्येक १० डीव्हीआर शेअर्समागे गुंतवणूकदारांना टाटा मोटर्सचे ७ साधारण शेअर्स मिळतील. यासाठी कंपनीने यापूर्वी १ सप्टेंबरही विक्रमी तारीख निश्चित केली होती. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. टाटा मोटर्सला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (एनसीएलटी) मुंबई खंडपीठाकडून मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली होती. डीव्हीआर शेअर्स सामान्य शेअर्सपेक्षा कमी मतदानाचा अधिकार देतात. तर डीव्हीआर शेअर्स सहसा सामान्य शेअर्सपेक्षा जास्त लाभांश देतात.

२ वर्षात २३३ टक्क्यांची वाढ

टाटा मोटर्स डीव्हीआरचा शेअर दोन वर्षांत २२३ टक्क्यांनी वधारला. मुंबई शेअर बाजारात टाटा मोटर्स डीव्हीआरचा शेअर गुरुवारी २.५ टक्क्यांनी वधारून ७६५.१५ रुपयांवर बंद झाला. टाटा मोटर्स डीव्हीआरच्या शेअरमध्ये गेल्या दोन वर्षांत २२३ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात टाटा मोटर्स डीव्हीआरच्या शेअरमध्ये ८५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या ३ महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये १७ टक्क्यांची वाढ झाली आहे. टाटा मोटर्सच्या डीव्हीआर शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ८०४.६० रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३९६.७५ रुपये आहे. टाटा मोटर्स डीव्हीआरचा शेअर बुधवारी ७४६.३० रुपयांवर बंद झाला.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजारगुंतवणूक