Gautam Adani net worth : सप्टेंबर महिन्यात ऐतिहासिक उच्चांकीवर पोहचलेल्या भारतीय शेअर बाजार ऑक्टोबर महिन्यात जोरदार आपटला. यामध्ये लाखो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. भारतीय शेअर बाजारातील प्रचंड घसरणीचा परिणाम देशातील सर्वात श्रीमंत लोकांच्या संपत्तीवरही दिसून येत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत सोमवारी मोठी घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांच्या संपत्तीतही एकाच दिवसात लक्षणीय घट झाली आहे. यामुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत या दोघांचीही क्रमवारी घसरली आहे. सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ९४१ अंकांनी घसरून ७८,७८२ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३०९ अंकांच्या घसरणीसह २३,९९५ वर बंद झाला.
मुकेश अंबानींना २३,३९० कोटी रुपयांचा तोटा
सोमवारी मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत २३,३९० कोटी रुपयांची घट झाली. यामुळे त्यांची एकूण संपत्ती९८.८ अब्ज डॉलर झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीनुसार, मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १७व्या स्थानावर घसरले आहेत. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती या वर्षात आतापर्यंत एकूण २.४२ अब्ज डॉलरने वाढली आहे.
गौतम अदानी यांना १७,३३२ कोटी रुपयांचे नुकसान
देशातील दुसरे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांनाही या घसरणीचा फटका बसला. त्यांच्या संपत्तीत १७,३३२ कोटी रुपयांचे नुकसान झाले. यामुळे त्यांची एकूण संपत्ती ९२.३ अब्ज डॉलर झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीनुसार, गौतम अदानी आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत १८व्या स्थानावर घसरले आहेत. या वर्षात आतापर्यंत, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ८.०५ अब्ज डॉलर इतकी वाढली आहे.
जगातील अव्वल श्रीमंतांच्या संपत्तीतही घसरण
केवळ अदानी-अंबानीच नाही तर जगातील टॉप ५ श्रीमंतांच्या संपत्तीतही सोमवारी मोठी घसरण झाली. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांच्या संपत्तीत सोमवारी ४.३९ अब्ज डॉलरची घसरण झाली. दुसऱ्या स्थानावर असलेल्या जेफ बेझोस यांना त्यांच्या एकूण संपत्तीत १.९४ बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मार्क झुकेरबर्गची संपत्ती २.२३ अब्ज डॉलरने घसरली. चौथ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती, लॅरी एलिसन यांची संपत्ती ५३८ मिलियन डॉलरने घसरली. तर पाचव्या क्रमांकावर असलेल्या बर्नार्ड अर्नॉल्ट यांना ३५३ मिलियन डॉलर्सचा फटका बसला.