Join us  

Baazar Style Retail IPO : झुनझुनवालांची गुंतवणूक असलेल्या कंपनीच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद; GMP ही वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 1:00 PM

Baazar Style Retail IPO: पाहा कोणती आहे ही कंपनी आणि आयपीओसाठी कधीपर्यंत करता येणार अर्ज. पहिल्याच दिवशी या आयपीओला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

Baazar Style Retail IPO: बाजार स्टाईल रिटेलचा आयपीओ आज म्हणजेच शुक्रवारी खुला झाला आहे. रेखा राकेश झुनझुनवाला यांनीही या कंपनीत गुंतवणूक केली आहे. बाजार स्टाइल रिटेल आयपीओला आतापर्यंत गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळालाय. ग्रे मार्केटमध्येही कंपनी चांगली कामगिरी करत आहे. चला जाणून घेऊया या कंपनीबद्दल सविस्तर माहिती.

प्राइस बँड ३७० ते ३८९ रुपये

बझार स्टाइल रिटेल आयपीओ ३ सप्टेंबरपर्यंत खुला राहणार आहे. आयपीओसाठी प्रति शेअर ३७० ते ३८९ रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. कंपनीनं एकूण ३८ शेअर्सचा एक लॉट तयार केलाय. ज्यामुळे गुंतवणूकदारांना किमान १४,७८२ रुपयांची गुंतवणूक करावी लागणारे. कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना प्रति शेअर ३५ रुपयांची सूट दिली आहे.

अँकर गुंतवणूकदारांकडून २५०.१० कोटी जमवले

हा आयपीओ गुरुवारी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला. कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून २५०.१० कोटी रुपये उभे केले आहेत. अँकर इन्व्हेस्टर्सना देण्यात येणाऱ्या शेअर्समध्ये ५० टक्के लॉक-इन पीरियड फक्त ३० दिवसांचा असतो. तर उर्वरित ५० टक्के लोकांचा लॉक-इन पिरिअड ९० दिवसांचा आहे.

बझार स्टाइल रिटेल आयपीओची साईज ८३४.६८ कोटी रुपये आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून ३८ लाख नवे शेअर्स जारी करणार आहे. तर ऑफर फॉर सेल अंतर्गत १.७७ कोटी शेअर्स जारी केले जातील. दिग्गज गुंतवणूकदार रेखा राकेश झुनझुनवाला देखील आयपीओच्या माध्यमातून २.७२ मिलियन शेअर्सची विक्री करत आहेत. त्यांच्याशिवाय इतरही अनेक गुंतवणूकदार कंपनीतील आपला हिस्सा कमी करत आहेत.

ग्रे मार्केटमध्ये मजबूत स्थिती

इन्व्हेस्टर्स गेन्सच्या रिपोर्टनुसार, आयपीओ आज १३० रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत होता. मजबूत जीएमपीकडून गुंतवणूकदारांना चांगल्या लिस्टिंगची अपेक्षा आहे. लिस्टिंग दरम्यान हाच ट्रेंड दिसला तर आयपीओ ५०० रुपयांच्या पुढे लिस्ट होऊ शकतो.

इन्व्हेस्टर्स गेन्सच्या रिपोर्टनुसार, आयपीओ दुपारच्या सुमारास आयपीओ २५ टक्के सबस्क्राईब झाला होता. किरकोळ श्रेणीत ०.४२ पट, एनआयआय श्रेणीत ०.१७ पट सब्सक्रिप्शन मिळालं होतं. कर्मचाऱ्यांच्या श्रेणीत या आयपीओला सर्वाधिक सबस्क्रिप्शन मिळालं होतं. दुपारपर्यंत हा आयपीओ ३ पटीने सब्सक्राइब झाला होता.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकइनिशिअल पब्लिक ऑफरिंग