Join us

ट्रम्प यांनी भरली गुंतवणूकदारांची झोळी, अमेरिकन बाजारात रेकॉर्ड ब्रेकिंग तेजी; भारताला मिळणार नाही फायदा, पाहा का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 10:51 IST

Trump Tariff: बुधवारी अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. ट्रम्प शुल्काबाबत आपली भूमिका कशी घेतात याकडे अमेरिकन शेअर बाजाराचं लक्ष लागलं होतं.

Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफला ९० दिवसांची स्थगिती जाहीर केली आहे, परंतु चीनला या सवलतीतून वगळण्यात आलंय. यानंतर बुधवारी अमेरिकेच्या शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. ट्रम्प शुल्काबाबत आपली भूमिका कशी घेतात याकडे अमेरिकन शेअर बाजाराचं लक्ष लागलं होतं. ट्रम्प यांनी बहुतांश रेसिप्रोकल टॅरिफ थांबवल्याची पोस्ट सोशल मीडियावर करताच गुंतवणूकदारांनी ताबडतोब शेअर्स खरेदी करण्यास सुरुवात केली. डाऊ जोन्सनं इतिहासात पहिल्यांदाच तीन हजार अंकांची झेप घेतली. त्याचा परिणाम आज आशियाई बाजारातही दिसून येत आहे. जपानचा बाजार उघडताच १० टक्क्यांनी वधारला. पण भारतीय गुंतवणूकदारांना याचा फायदा मिळणार नाही कारण आज महावीर जयंतीमुळे देशांतर्गत शेअर बाजार बंद आहे.

ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिकेच्या शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी आली. व्यापारादरम्यान डाऊ जोन्सनं प्रथमच ३,००० अंकांची झेप घेतली. अखेर तो २,९६३ अंकांनी म्हणजेच ७.८७ टक्क्यांनी वधारला. एस अँड पी ५०० मध्ये ९.५२% वाढ झाली. टेक्नॉलॉजी शेअर्स नॅसडॅकनं १२.१६ टक्क्यांनी झेप घेतली. एस अँड पी ५०० साठी हा ऑक्टोबर २००८ नंतरचा सर्वोत्तम दिवस होता. त्याचप्रमाणं नॅसडॅकसाठी हा जानेवारी २००१ नंतरचा सर्वोत्तम दिवस होता आणि इतिहासातील दुसरा सर्वोत्तम दिवस होता. डाऊ जोन्समध्ये गेल्या पाच वर्षांतील सर्वात मोठी तेजी दिसून आली.

का आली तेजी?

बाजारातील ही तेजी प्रचंड असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यावरून बाजार या मुद्द्यावर स्पष्टतेसाठी किती आतुर होता, हे दिसून येते. एस अँड पी ५०० मध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक कंपनीचे शेअर्स वधारले. अॅमेझॉनचे शेअर्स ११.९८ टक्के, नायकीचे ११.३६ टक्के, युनायटेड एअरलाइन्सचे २६.१४ टक्के, डेल्टा एअर २३.३८ टक्के आणि अमेरिकन एअरलाइन्सचे शेअर्स २२.६ टक्क्यांनी वधारले. नॅसडॅकवर अॅपलचा शेअर १५.३३ टक्क्यांनी वधारला. त्याचप्रमाणे एनव्हिडिया १८.७२ टक्के आणि टेस्ला २२.६९ टक्क्यांनी वधारले.

एस अँड पी ५०० दोन दिवसांपूर्वीच्या नीचांकी पातळीच्या तुलनेत १२.८६ टक्क्यांनी वधारला आहे. परंतु २ एप्रिलच्या पातळीपेक्षा तो अजूनही ३.७ टक्क्यांनी खाली आहे. २ एप्रिल रोजी ट्रम्प यांनी पहिल्यांदा परस्पर शुल्काची घोषणा केली होती. नॅसडॅक अजूनही २ एप्रिलच्या पातळीपेक्षा २.७ टक्क्यांनी घसरला आहे. ट्रम्प यांच्या घोषणेनंतर गुंतवणूकदारांनी शेअर्सची जोरदार खरेदी केली आणि बाजाराला वेग आला. पण ट्रम्प यांनी चीनसोबतचे व्यापारयुद्ध वाढवल्यानं अजूनही अनिश्चितता कायम आहे. त्यांनी टॅरिफ १०४ टक्क्यांवरून १२५ टक्क्यांपर्यंत वाढवलं आहे.

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पअमेरिकाशेअर बाजार