Join us  

ट्विटरच्या चिमणीने उडविला इलॉन मस्क यांचा मुकुटमणी; सर्वांत श्रीमंत व्यक्तीचा बहुमान गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 12:06 PM

बर्नार्ड अर्नाल्ट यांची संपत्ती १८६.५ अब्ज डाॅलर्स एवढी झाली, तर मस्क यांच्या संपत्तीत तब्बल ७.४ अब्ज डाॅलर्सची घट झाली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीचा बहुमान इलॉन मस्क यांनी गमावला आहे. टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क यांनी एप्रिलमध्ये समाजमाध्यम प्लॅटफॉर्म ट्विटरसाठी बोली लावल्यानंतर टेस्लाचे बाजारमूल्य जवळपास अर्ध्याने कमी झाले आहे. तेव्हापासून मस्क यांची संपत्तीही सुमारे ७० अब्ज डॉलरने कमी झाली आहे. त्यांना मागे टाकून फॅशन समूह ‘लुई वुईटन’चे प्रमुख बर्नार्ड अरनॉल्ट हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

बर्नार्ड अर्नाल्ट यांची संपत्ती १८६.५ अब्ज डाॅलर्स एवढी झाली, तर मस्क यांच्या संपत्तीत तब्बल ७.४ अब्ज डाॅलर्सची घट झाली असून, ती एकूण १८१.३ अब्ज डाॅलर्सवर आली आहे. त्यामुळे मस्क यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकुट अरनॉल्ट यांनी हिरावून घेतला आहे. इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाचे समभाग १३ एप्रिल रोजी ३४०.७९ डॉलरवर होते. त्याच्या एकच दिवस आधी ट्विटरने नियामकीय दस्तावेजात खुलासा केला होता की, मस्क हे ट्विटर कंपनी ४३.४ अब्ज डॉलरमध्ये खरेदी करीत आहेत. तेव्हापासून टेस्लाचे समभाग ५० टक्क्यांनी घसरून १६७.८२ डॉलरवर आले आहेत.

तिसऱ्या स्थानी अदानीभारतीय उद्याेगपती गाैतम अदानी तिसऱ्या स्थानावर कायम आहेत. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे या यादीत आठव्या स्थानी आहेत.

टेस्लाचे समभाग विकलेnट्विटर खरेदी करण्यासाठी इलॉन मस्क यांनी एप्रिलपासून टेस्लाचे २० अब्ज डॉलरचे समभाग विकले आहेत. nमस्क यांची स्पेसएक्स नावाची एक रॉकेट कंपनीही आहे. या सर्व कंपन्यांना मस्क वेळ कसा देणार यावरून टेस्लाच्या समभागधारकांना चिंता वाटते. nत्यामुळे तेदेखील समभाग विकून टेस्लामध्ये केलेली गुंतवणूक बाहेर काढत आहेत.

अरनॉल्ट आणि मस्क यांच्यातील दरी वाढलीnदोनच दिवसांपूर्वी इलॉन मस्क यांनी फोर्ब्सच्या ‘रिअल-टाइम बिलेनिअर्स’च्या यादीत जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीचा किताब थोड्या वेळासाठी गमावला होता. nफॅशन समूह ‘लुई वुईटन’चे प्रमुख बर्नार्ड अरनॉल्ट यांनी मस्क यांची जागा घेतली होती. टेस्लाचे समभाग ढासळल्याने मस्क दुसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. nयावेळी दोघांमधील दरी तब्बल ६ अब्ज डॉलर्स एवढी झाली आहे. टेस्लाचे शेअर्स सातत्याने घसरत आहेत. त्यामुळे दरी आणखी वाढणार आहे. 

टॅग्स :एलन रीव्ह मस्कट्विटर