Upcoming IPOs: जर तुम्हाला आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल तर या आठवड्यात तुमच्याकडे चांगली संधी आहे. या आठवड्यात ३ नवीन कंपन्यांचे आयपीओ उघडणार आहेत. या आयपीओमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. यापूर्वी अनेक कंपन्यांचे आयपीओ खुले झाले होते. यातील काहींमध्ये गुंतवणूकदारांनी चांगला नफा कमावला. त्याचबरोबर अनेक आयपीओंमध्ये गुंतवणूकदारांचं नुकसानही झाले आहे. बकरी ईदमुळे या आठवड्यात आज म्हणजेच सोमवारी शेअर बाजार बंद राहणार आहे. मंगळवार, १८ जून रोजी बाजारात व्यवहार होतील. बकरी ईदची सुट्टी असल्यानं या आठवड्यात केवळ ४ दिवस बाजारात व्यवहार होणारेत. याच आठवड्यात खुल्या होणाऱ्या आयपीओंबद्दल आज आपण जाणून घेऊ.
१९ जूनला उघडणार 'हा' आयपीओ
डीईई पाइपिंग सिस्टीम्सचा (DEE Piping Systems) आयपीओ १९ जून रोजी खुला होणार आहे. गुंतवणूकदार या आयपीओमध्ये २१ जूनपर्यंत गुंतवणूक करू शकतात. याचं लिस्टिंग बीएसई आणि एनएसईवर असेल. प्रति शेअर १९३ ते २०३ रुपये असा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना यात किमान १४ हजार ८१९ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये ३२५ कोटी रुपयांचे १.६ कोटी नवे शेअर्स जारी करण्यात येणार आहेत. तसंच ९३.०१ कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेलही असेल.
तर दुसरीकडे अक्मे फिनट्रेड इंडिया लिमिटेडचा (Akme Fintrade India Ltd) आयपीओही १९ जून रोजी खुला होणार आहे. हा आयपीओ १३२ कोटी रुपयांचा असून तो २१ जूनपर्यंत खुला राहणार आहे. यामध्ये १.१ कोटी नवे शेअर्स जारी केले जातील. शेअर्सचं वाटप २४ जून रोजी होणार आहे. २६ जून रोजी बीएसई आणि एनएसईवर कंपनीचे शेअर्स लिस्ट होईल. आयपीओसाठी प्राइस बँड ११४ ते १२० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आलाय. यात मिनिमम लॉट साईज १२५ शेअर्सचा असेल. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये किमान १५ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
स्टॅनली लाइफस्टाइल्स लिमिटेडचा आयपीओ
स्टॅनली लाइफस्टाइल्स लिमिटेडचा आयपीओ २१ जून रोजी खुला होईल. या आयपीओमध्ये २५ जूनपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. शेअर्सचं वाटप २६ जून रोजी होणार असून २८ जून रोजी शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होतील. आयपीओसाठी प्राइस बँड ३५१ ते ३६९ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आलाय. यात कमीत कमी ४० शेअर्सचा लॉट साइज आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना यासाठी किमान १४ हजार ७६० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)