Saj Hotels IPO Listing: व्हिला आणि रिसॉर्ट पुरवणाऱ्या साज हॉटेल्सच्या शेअर्सनं एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर आज एन्ट्री घेतली. किरकोळ गुंतवणूकदारांच्या जोरावर त्याच्या आयपीओला एकूण ५ पटीनं बोली लागली. आयपीओ अंतर्गत ६५ रुपयांच्या भावानं शेअर्स जारी करण्यात आले होते. आज एनएसई एसएमईवर तो ५५.०० रुपयांवर लिस्ट झाला. म्हणजेच आयपीओ गुंतवणूकदारांनी लिस्टिंग नफ्याऐवजी १५.३८ टक्क्यांचं नुकसान सोसावं लागलं. मात्र, लिस्टिंगनंतर शेअरमध्ये तेजी दिसून आली आणि तो ५७.७५ रुपयांच्या अपर सर्किटवर (aj Hotels Share Price) पोहोचला. परंतु आयपीओतील गुंतवणूकदारांना अजूनही ११.१५ टक्क्यांचा तोटा झालाय.
आयपीओला उत्तम प्रतिसाद
साज हॉटेल्सचा २७.६३ कोटी रुपयांचा आयपीओ २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला. किरकोळ गुंतवणूकदारांच्या जोरावर या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि ५.४६ पट ओव्हरसेल झाला.
किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या भागापैकी अर्धा भाग ८.६५ पट भरण्यात आला. या आयपीओअंतर्गत १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे ४२.५० लाख नवे शेअर्स जारी करण्यात आले आहेत. या शेअर्सच्या माध्यमातून जमा होणारा निधी कंपनी सध्याच्या रिसॉर्ट मालमत्तांचा विस्तार करण्यासाठी, वर्किंग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरणार आहे.
साज हॉटेल्स बद्दल माहिती
फेब्रुवारी १९८१ मध्ये स्थापन झालेल्या साज हॉटेल्समध्ये रिसॉर्ट्स, व्हिला, रेस्टॉरंट्स आणि बार प्रॉपर्टी आहेत. यात तीन रिसॉर्ट मालमत्ता असून, त्यापैकी दोन ते स्वत:हून चालतात आणि एक भाडेतत्त्वावर आहे. MyOnRooms.in प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कंपनीची ५० टक्के गुंतवणूक असून या माध्यमातून कंपनीनं आपल्या हॉस्पिटॅलिटी पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. कंपनीच्या आर्थिक स्थितीचा विचार केल्यास आर्थिक वर्ष २०२१ मध्ये कंपनीला १.२० कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता.
मात्र, पुढच्याच आर्थिक वर्ष २०२२ मध्ये तो १.४४ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्यावर आला, जो पुढील आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ३.५६ कोटी रुपयांवर पोहोचला. मात्र, पुढच्याच आर्थिक वर्ष २०२४ मध्ये नफा किंचित घसरून ३.४५ कोटी रुपयांवर आला. या कालावधीत कंपनीचा महसूल वार्षिक २१ टक्क्यांहून अधिक चक्रवाढ वाढीच्या दरानं (CAGR) वाढून १४.५५ कोटी रुपये झाला आहे.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेण आवश्यक आहे.)