Join us

US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 8:31 AM

US Fed Rate Cut : अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं यंदा अपेक्षेप्रमाणे व्याजदरात कपात केली आहे. पाहूया भारतीय शेअर बाजारावर याचा काय परिणाम होऊ शकतो.

US Fed Rate Cut : अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं यंदा अपेक्षेप्रमाणे व्याजदरात कपात केली आहे. अमेरिकन फेडनं व्याजदरात २५ बेसिस पॉईंट म्हणजेच ०.२५ टक्क्यांची कपात केली. फेडनं गुरुवारी रात्री उशिरा व्याजदरात कपात जाहीर केली. कमी होणारी महागाई आणि आर्थिक घडामोडींचा विस्तार लक्षात घेता ही दरकपात करण्यात आली आहे. जॉब मार्केटमध्ये सुधारणा झाली असली तरी ग्रोथ अद्यापही फार कमी असल्याचंही त्यांनी म्हटलं.

महागाईत घट

महागाईचा दर सातत्यानं अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या २ टक्क्यांच्या उद्दिष्टाच्या जवळ जात आहे. जॉब मार्केटमध्ये सुधारणा झाली आहे. परंतु ग्रोथ कमी असल्याचं फेड रिझर्व्हनं म्हटलंय. 'आर्थिक घडामोडी अतिशय वेगानं वाढत आहेत. मुख्य व्याजदर ४.५० टक्के ते ४.७५ टक्क्यांदरम्यान करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला,' अशी माहिती फेडरल ओपन मार्केट कमिटी या मध्यवर्ती बँकेच्या व्याजदर निश्चिती समितीनं दिली. तसंच निवडणुकीचा धोरणात्मक निर्णयांवर कोणताही परिणाम झाला नसल्याची प्रतिक्रिया यूएस फेडचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी दिली.

शेअर बाजारावर काय परिणाम होणार?

फेडच्या या निर्णयाकडे शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांचं लक्ष होतं. गुंतवणूकदारांच्या अपेक्षेप्रमाणे फेडनं व्याजदरात ०.२५ टक्के कपात केली आहे. तज्ज्ञांच्या मते फेडच्या या निर्णयाचा शेअर बाजारावर फारसा परिणाम होणार नाही. कारण फेड ०.२५ टक्के कपात करेल, अशी बाजाराला आधीच अपेक्षा होती. भारतीय शेअर बाजार गुरुवारी मोठ्या घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १.०४ टक्के म्हणजेच ८३६ अंकांनी घसरून ७९,५४१ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १.१६ टक्के म्हणजेच २८४ अंकांच्या घसरणीसह २४,१९९ वर बंद झाला.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकअमेरिका