Trump Tariff on America: अमेरिकेच्या शेअर बाजारात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे पाच ट्रिलियन डॉलर्सचं नुकसान झालं. शुक्रवारी नॅसडॅकमध्ये मोठी घसरण झाली आणि तो रेड झोनवर आला. डाऊ जोन्स ५.५ टक्क्यांनी घसरला. एस अँड पी ५०० जवळपास ६ टक्क्यांनी घसरला. नॅसडॅक ५.८ टक्क्यांनी घसरून 'बेअर मार्केट'वर आला.
ट्रम्प यांच्या या शुल्कामुळे जग हादरलं आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून चीननं शुक्रवारी अमेरिकेच्या सर्व आयातीवर अतिरिक्त ३४ टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली. यामुळे जागतिक व्यापारयुद्ध आणखी धोकादायक पातळीवर पोहोचलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं व्यापारयुद्ध जगाला मंदीच्या दिशेनं ढकलून देईल, अशी भीती गुंतवणूकदारांना वाटत आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी या घसरणीबाबत बोलाना काही वेदना सहन कराव्या लागतील असंही म्हटलं.
व्याजदर कमी होण्याची आशा भंगली
फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल व्याजदर कपातीचे संकेत देऊन मदत करतील, अशी गुंतवणूकदारांना आशा होती. ट्रम्प यांनी सोशल मीडियावरही यासाठी दबाव आणला होता. पण पॉवेल यांनी विकास आणि महागाई या दोन्हींसाठी 'हाय रिस्क'वर भर दिला. यामुळे गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या. फेडरल रिझर्व्ह ही अमेरिकेची मध्यवर्ती बँक आहे.
पॉवेल यांच्या 'वेट अँड वॉच' या वृत्तीनं वॉल स्ट्रीट अधिकच हादरून गेला. एस अँड पी ५०० ६ टक्क्यांनी घसरला आणि अवघ्या दोन दिवसांत निर्देशांकाचं मार्केट कॅप ५ ट्रिलियन डॉलरन घसरल. एस अँड पी ५०० हा अमेरिकेतील ५०० मोठ्या कंपन्यांचा निर्देशांक आहे.
कोरोनानंतर मोठी घसरण
२०२० मधील महासाथीनंतर जागतिक शेअर बाजारातील ही सर्वात मोठी घसरण आहे. पण २००८ च्या जागतिक आर्थिक संकटाप्रमाणे वॉल स्ट्रीटमधील सध्याची उलथापालथ ही सरकारनं घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांचा परिणाम आहे. असा परिणाम होणं शक्य आहे, हे सरकारला ठाऊक होते. अनेक विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, असं कधीच घडलं नव्हतं.
१०० वर्षांतील अमेरिकेचं सर्वाधिक शुल्क
जेपी मॉर्गनच्या विश्लेषकांच्या मते, १९६८ नंतर अमेरिकेची ही सर्वात मोठी करवाढ आहे. आता जागतिक मंदी येण्याची दाट शक्यता असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेच्या इक्विटी मार्केट कॅपमध्ये ८ ट्रिलियन डॉलरची घसरण झाली असून, त्यापैकी ५ ट्रिलियन डॉलर्स केवळ दोन दिवसांत कमी झाले आहेत.
ट्रम्प काय म्हणाले?
शुक्रवारी अमेरिकेच्या बाजारातील घसरणीवरही ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली. थोड्या वेदना तर सहन कराव्याच लागतील, असं ट्रम्प म्हणाले. 'केवळ दुर्बलच अपयशी ठरतील. हे तात्पुरतं आहे. आपली रणनीती खूप चांगली आहे. हे आताचं नुकसान दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल, असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे.
आयफोन ४०% महागणार?
सर्वाधिक आयफोनचे उत्पादन चीनमध्ये होते आणि ट्रम्प यांच्या आयात शुल्काचा सर्वाधिक फटका चीनलाच बसणार आहे. चीनमधून येणाऱ्या या फोनवर वाढीव आयात शुल्क लागणार आहे. अशा परिस्थितीत ॲपलसमोर दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे वाढीव शुल्काचा भार स्वत: कंपनीनं सहन करणं आणि दुसरा म्हणजे हा बोजा ग्राहकांवर ढकलणं.