Join us  

तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासात करा तंत्रज्ञानाचा 'स्मार्ट' वापर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 9:28 AM

शेअर बाजारात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि मिळणाऱ्या परताव्यामुळे गुंतवणूकदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तंत्रज्ञान जसं वाढलंय तशी आपली जबाबदारीही अधिक वाढली आहे.

आजकाल अनेक जण रिअल इस्टेट, सोनं, बँकेतील फिक्स्ड डिपॉझिट यांसारख्या गुंतवणूकीच्या पारंपारिक पद्धती सोडून शेअर बाजाराच्या माध्यमातून कॅपिटल मार्केटकडे वळताहेत. सीडीएसएल आणि एनएसडीएलच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या डेटानुसार, भारतातील डीमॅट खात्यांची संख्या १७.१० कोटींवर पोहोचली आहे.

कॅपिटल मार्केटमध्ये तंत्रज्ञानाचे फायदे काय?

कॅपिटल मार्केटचा अवलंब वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे तंत्रज्ञानाची प्रगती आणि सुलभता हे आहे. ट्रेडिंग तंत्रज्ञानामुळे आता खर्चात कपात शक्य झाली आहे. तंत्रज्ञानामुळे ट्रान्झॅक्शन आणि कम्प्लायन्स कॉस्ट कमी झाली आहे. ट्रेडिंग तंत्रज्ञानामुळे कार्यक्षमता आणि पारदर्शकताही वाढते. याशिवाय नवीन बिझनेस मॉडेल्स, ॲप्लिकेशन्स, प्रक्रिया आणि उत्पादनांची वाढ होते. ट्रेडिंग टेक्नॉलॉजी प्रोसेस ऑटोमेशन, एआयचा वापर अशाही गोष्टी शक्य झाल्या आहे.

गुंतवणूकदारांना जोखमीची जाणीव असावी

शेअर बाजारात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणि मिळणाऱ्या परताव्यामुळे गुंतवणूकदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. असं असलं तरी दुसरीकडे आता मोठ्या प्रमाणात स्कॅम्सही वाढू लागलेत. शेअर ट्रेडिंग स्कॅम आता ऑनलाइन फसवणुकीचं आवडतं हत्यार बनलंय. छोट्या-मोठ्या अशा अनेक शहरांमध्ये सायबर फ्रॉडच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीये. मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून लोकांकडून पैसे ठगण्याचे प्रकार सध्या वाढत आहे आणि यात प्रामुख्यानं नवे गुंतवणूकदार अडकत आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना अशा स्कॅमर्सपासून सावध राहण्याची आणि आमिषाला बळी न पडण्याची आवश्यकता आहे.

गुंतवणूक करताना घ्यायची खबरदारी

तंत्रज्ञान जसं वाढलंय तशी आपली जबाबदारीही अधिक वाढली आहे, तंत्रज्ञानामुळे गुंतवणूकदारांना गुंतवणूक करणं सोपं झालं आहे. परंतु फसवणूक होऊ नये म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य ती काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

गुंतवणूक करताना त्याविषयीचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा आहे. अन्यथा फायद्यापेक्षा नुकसान अधिक होण्याची शक्यता बळावते. जोखीम कमी आहे आणि त्यातून मिळणारे रिटर्न जास्त आहेत असं म्हटलं, तर त्या आमिषाला बिलकूल बळी पडू नये. इतकंच काय तर गुंतवणूकीचा सल्ला देणारी व्यक्ती किंवा कंपनी नियामकाकडे नोंदणीकृत असणं हे अत्यावश्यक आहे. गुंतवणूक करताना या गोष्टीकडेही लक्ष देणं तितकंच आवश्यक आहे. जर कोणीही ईमेल किंवा कॉलद्वारे तुम्हाला ऑफर देत असेल, तर त्वरित निर्णय घेणं टाळणं गरजेचं आहे. त्याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच पुढचा निर्णय घेणं योग्य ठरेल, त्याकडे दुर्लक्ष करणंही तुमचा मेहनतीचा पैसा वाचवू शकतो. महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमचा मेहनतीचा पैसा सुरक्षित ठेवू शकता, ऐऱ्या गैऱ्या कोणत्याही व्यक्तीवर विश्वास न ठेवता, या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मगच गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं.

हा लेख बीएसई इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड आणि सेबीद्वारे भारतात १४-२० ऑक्टोबर २०२४ दरम्यान साजरा केल्या जाणाऱ्या जागतिक गुंतवणूक सप्ताहाचा (WIW) भाग आहे.