Join us

दिग्गज गुंतवणूकदार दमानींनी खरेदी केले ८ लाख शेअर्स; २ दिवसांत २९ टक्क्यांनी वाढली 'या' शेअरची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 4:31 PM

सोमवारी कंपनीचा शेअर २० टक्क्यांनी वधारून १५३.९० रुपयांवर पोहोचला. दिग्गज गुंतवणूकदार दमानी यांचं नाव शुक्रवारी एनआयआयटीच्या शेअर्सच्या झालेल्या ब्लॉक डीलमध्ये खरेदीदार म्हणून समोर आले आहे.

स्मॉलकॅप कंपनी एनआयआयटी लिमिटेडच्या शेअर्समध्ये आज तुफान तेजी दिसून आली. सोमवारी एनआयआयटी लिमिटेडचा शेअर २० टक्क्यांनी वधारून १५३.९० रुपयांवर पोहोचला. दिग्गज गुंतवणूकदार रमेश दमानी यांचं नाव शुक्रवारी एनआयआयटीच्या शेअर्सच्या झालेल्या ब्लॉक डीलमध्ये खरेदीदार म्हणून समोर आले आहे. दोन दिवसांत एनआयआयटीच्या शेअरमध्ये २९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सोमवारी एनआयआयटीचा शेअर १५४.६३ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ७८.५० रुपये आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, रमेश दमानी यांनी एनआयआयटी लिमिटेडचे ८ लाख शेअर्स खरेदी केले आहेत. दमानी यांनी सरासरी १२७.५० रुपये प्रति शेअर दरानं हे शेअर्स खरेदी केले. जून २०२४ तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्न पाहता दमानी यांचा यापूर्वी एनआयआयटीमध्ये हिस्सा नव्हता. कंपनीत त्यांचा हिस्सा असला, तरी शेअरहोल्डर्सच्या यादीत त्यांचे नाव नसल्यानं तो १ टक्क्यांपेक्षा कमी असू शकतो. गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये ३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. एका वर्षात एनआयआयटी लिमिटेडच्या शेअरमध्ये ९३ टक्के वाढ झाली आहे.

शुक्रवारी ३५.४ लाख शेअर्सचे व्यवहार

शुक्रवारी एनआयआयटी लिमिटेडच्या ३५.४ लाख शेअर्सचे व्यवहार झाले. या व्यवहाराचं मूल्य ४२ कोटी रुपये होते आणि सरासरी किंमत ११८ रुपये प्रति शेअर होती. एनआयआयटीच्या प्रवर्तकांनीही २२ ऑगस्ट रोजी कंपनीतील मोठा हिस्सा खरेदी केला. बल्क डीलच्या आकडेवारीनुसार, प्रवर्तक पवार फॅमिली ट्रस्ट आणि थडानी फॅमिली ट्रस्ट या दोघांनी गुरुवारी सरासरी ११८ रुपये प्रति शेअर दरानं १७,६९,०२६ शेअर्स खरेदी केले. 

दोन्ही प्रवर्तकांनी मिळून एनआयआयटीचे ३५.३८ लाख शेअर्स खरेदी केले, जे कंपनीच्या एकूण इक्विटीच्या २.६२ टक्के आहेत. या व्यवहारानंतर कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा जून २०२४ तिमाहीअखेर ३४.६६ टक्क्यांवरून ३७.२८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक