Vodafone Idea Share: देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडिया (Vi)च्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अवघ्या दोन दिवसांत हा शेअर 30 टक्क्यांहून अधिक वधारला. शुक्रवारी Vi चा शेअर 20 टक्क्यांच्या अप्पर सर्किटला गेला होता, तर आजही या शेअरमध्ये 10 टक्क्यांची वाढ दिसून आली.
गेल्या 4-5 वर्षांत व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. कंपनीच्या कर्जामुळे हा स्टॉक खूपच घसरला होता. पण, गेल्या एका वर्षात शेअरने 102 टक्क्यांची वाढ नोंदवली, म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले.
स्टॉक अचानक का वाढला?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेअरच्या किमतीत झालेली वाढ कंपनीच्या प्रमोटर्सनी केलेल्या कथित इक्विटी गुंतवणुकीचा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे. शेअर बाजार अजूनही कंपनीच्या निधी उभारणीच्या योजनेवर स्पष्टतेची वाट पाहत आहे. कंपनीच्या मॅनेजमेंटने सप्टेंबरच्या तिमाहीत याबद्दल सांगितले होते. यादरम्यान, प्रवर्तकांनी सांगितले होते की, ते डिसेंबर तिमाहीच्या अखेरीस ₹2,000 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणार आहेत.
या वर्षीच्या इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये व्होडाफोन आयडियाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी सांगितले होते की, कंपनी 5G रोलआउटसाठी पुढील काही तिमाहीत लक्षणीय गुंतवणूक करेल. मात्र, त्यासाठी कोणतीही कालमर्यादा देण्यात आलेली नाही.
एकेकाळी शेअरची किंमत 120 रुपये होती
1 जानेवारी 2015 रोजी व्होडा आयडियाचे शेअर्स 123 रुपयांच्या पातळीवर होते, परंतु कर्ज आणि आर्थिक संकटामुळे हा शेअर सातत्याने घसरत राहिला. 2020 मध्ये, कंपनीच्या शेअर्सनी 6.20 रुपयांचा नीचांक गाठला. तर, जानेवारी 2023 मध्ये व्होडा आयडियाच्या शेअर्सची किंमत 7.90 रुपये होती. आता मात्र हा शेअर्स 17 रुपयांच्या वर व्यवहार करत आहेत.