Join us  

Voltas Share Price : TATA समूहाच्या 'या' कंपनीचा निव्वळ नफा १६०% नं वाढला, शेअरमध्ये विक्रमी तेजी; तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 12:56 PM

Voltas Share Price : पहिल्या तिमाहीच्या जबरदस्त निकालानंतर आज टाटा समूहाच्या कंपनीचा शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळच्या व्यवहारात या शेअरच्या किंमतीत ९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

Voltas Share Price : पहिल्या तिमाहीच्या जबरदस्त निकालानंतर आज टाटा समूहाची कंपनी व्होल्टासच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळच्या व्यवहारात व्होल्टासच्या शेअरच्या किंमतीत ९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. व्होल्टासचा शेअर सकाळी १५०० रुपयांवर उघडला आणि १५६३ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. व्होल्टासचा निव्वळ नफा १६० टक्क्यांनी वाढून ३३५ कोटी रुपये झाला आहे.

३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा ४६ टक्क्यांनी वाढून ५,००१ कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षाच्या याच तिमाहीत ३,४३३० कोटी रुपये होता. करपूर्व उत्पन्न ४५२ कोटी रुपये म्हणजेच १२३ टक्क्यांनी अधिक होतं. हा त्याचा आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही नफा आहे.

यंदा कडक उन्हामुळे एसी, फ्रिज, कुलरची मागणी वाढली होती. व्होल्टासलाही याचा फायदा झाला. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सनं ५६ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मात्र, गेल्या वर्षभरात ८५.६१ टक्के परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांतील नीचांकी स्तर ७९४.२० रुपये आहे. आज सकाळच्या सुमारास व्होल्टास चा शेअर ७.२३ टक्क्यांनी वधारून १,५३३.६० रुपयांवर व्यवहार करत होता. 

काय म्हणाले एक्सपर्ट?

व्होल्टासच्या शेअर्सबद्दल शेअर बाजारातील तज्ज्ञांकडून सांगायचं झालं तर ३४ पैकी १४ जण त्यात खरेदीचा सल्ला देत आहेत. लाइव्ह मिंटनुसार, ५ जणांनी या शेअरला स्ट्राँग बाय आणि नऊ जणांनी बायचा सल्ला दिला आहे. याशिवाय १२ एक्सपर्ट्सनं शेअर होल्ड करण्याचा तर ८ जणांनी शेअर विकण्याचा सल्ला दिलाय. टेक्निकल चार्टवर दीर्घ आणि अल्प मुदतीसाठी हा शेअर तेजीत आहे.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :टाटाशेअर बाजार