Join us  

Electric वाहनांसाठी परदेशातून मिळाली ऑर्डर, शेअर खरेदीसाठी उड्या; लागलं २०% चं अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 2:37 PM

Wardwizard Innovations Share: कंपनीचे शेअर्स आज, सोमवारी चर्चेत आहेत. या शेअरनं आज २० टक्क्यांचा उच्चांक गाठला आणि हा शेअर ६२.७१ रुपयांवर पोहोचला.

Wardwizard Innovations Share: वॉर्डविझार्ड इनोव्हेशन अँड मोबिलिटी लिमिटेडचे (डब्ल्यूआयएमएल) शेअर्स आज, सोमवारी चर्चेत आहेत. कंपनीच्या शेअरनं आज २० टक्क्यांचा उच्चांक गाठला आणि हा शेअर ६२.७१ रुपयांवर पोहोचला. शेअर्समधील या तेजीमागे मोठी ऑर्डर आहे. जॉय ई-बाइकसाठी प्रसिद्ध असलेल्या भारतीय इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) कंपनीनं सांगितले की, फिलिपिन्सची कंपनी बेउला इंटरनॅशनल डेव्हलपमेंटकडून कॉर्पोरेशन (बीईयूएलए) कडून त्यांना १.२९ अब्ज डॉलरची ऑर्डर मिळाली आहे. या बातमीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. 

काय आहे अधिक माहिती? 

सामंजस्य कराराच्या माध्यमातून डब्ल्यूआयएमएल फिलिपाईन्समध्ये आपल्या विद्यमान इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी मॉडेलचं वितरण करेल, तसंच विशेषत: फिलिपाईन्सच्या बाजारपेठेसाठी नवीन चारचाकी व्यावसायिक वाहनं विकसित करेल, असे कंपनीनं एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे. डब्ल्यूआयएमएल जॉय ई-बाइक ब्रँड नावाखाली ईव्ही सेगमेंटमधील भारतातील वाहन उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. आपल्या पोर्टफोलिओमध्ये हाय आणि लो स्पीड अशा दोन्ही श्रेणींमध्ये १० हून अधिक मॉडेल्ससह, कंपनी भारतातील ४०० हून अधिक प्रमुख शहरांमध्ये सेवा पुरवत आहे. 

डब्ल्यूआयएमएलची सध्याची उत्पादन क्षमता ४ ते ६ लाख दुचाकी आणि ४० ते ५० हजार तीनचाकी वाहनांची आहे. १०,८०० कोटी रुपयांच्या ऑर्डरसह कंपनीला तीन वर्षांत ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 

कंपनी देशातील भारतीय ईव्ही उत्पादनाचं पॉवरहाऊस होण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करीत आहे. 'भारतातील ईव्ही बाजार २०२१-२०३० या कालावधीत ४९ टक्के चक्रवाढ वार्षिक विकास दर (सीएजीआर) मिळवेल आणि २०३० पर्यंत १० दशलक्ष वार्षिक विक्री करेल.' असा अंदाज इंडिया एनर्जी स्टोरेज अलायन्सनं  (आयईएसए) व्यक्त केलाय. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक