Warren Buffett Strategy: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेमुळे जगभरातील शेअर बाजार कोसळले. अमेरिकन बाजार तर मार्च 2020 नंतरच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. या घसरणीमुळे अनेक अब्जाधीशांनी आपल्या कोट्यवधी रुपयांची संपत्ती गमावली. पण, या घसरणीदरम्यान दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांना मोठा फायदा झाला. वॉरेन बफेट यांनी स्वतःची संपत्ती वाचवलीच नाही, तर एकूण संपत्ती 11.5 अब्ज डॉलर्सने वाढवून 155 अब्ज डॉलर्सवर नेली.
शेअर मार्केट क्रॅशमध्ये अनेकांना फटका
मार्केट क्रॅशमुळे जगातील 500 श्रीमंत व्यक्तींनी दोन दिवसांत 500 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती गमावली. केवळ शुक्रवारीच अब्जाधीशांना $329 अब्जाचा फटका बसला. हा कोव्हिड-19 नंतर झालेले सर्वात मोठे नुकसान आहे. विशेष म्हणजे, सर्वात मोठा धक्का इलॉन मस्क यांना बसला. त्यांची संपत्ती 135 अब्ज डॉलर्सने कमी झाली. तर, मार्क झुकरबर्ग यांना 27 अब्ज डॉलर्स, जेफ बेझोस 42.5 आणि बिल गेट्स यांना 3.38 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. याउलट, वॉरेन बफेट हे एकमेव अब्जाधीश होते, ज्यांची संपत्ती वाढली.
वॉरेन बफे यांना आधीच सगळं माहित होतं का?
वॉरेन बफे यांची संपत्ती वाढण्याचे कारण काय, त्यांना आधीच या मार्केट क्रॅशबद्दल माहिती होत होते का? असा प्रश्न विचारला जातोय. तर, बफे यांची संपत्ती वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, बफेट यांनी 2023 मध्ये घेतलेला निर्णय. जेव्हा सर्वजण शेअर बाजारातून नफा कमवत होते, तेव्हा बफे यांनी शेअर बाजारातील गुंतवणूक कमी केली होती. बफेट यांनी शेअर बाजारातून सूमारे 300 अब्ज डॉलर्स काढले आणि बँक खात्यात ठेवले.
याशिवाय 2024 मध्ये त्यांनी कोणतीही आक्रमक गुंतवणूक करणार नाही किंवा कोणत्याही नवीन मोठ्या करारात प्रवेश करणार नाही, असे ठरवले होते. त्यांनी आपल्या पोर्टफोलिओमधील स्टॉक हळूहळू विकण्यास सुरुवात केली. वर्षाच्या अखेरीस बर्कशायर हॅथवेकडे $334 अब्ज रोख मालमत्ता होती. तर, बफे यांच्याकडील रोख रक्कम बर्कशायरच्या एकूण बाजार मूल्याच्या जवळपास एक तृतीयांश आहे.