गेल्या काही दिवसांपासून पेटीएमचा शेअर चर्चेत आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर पेटीएमच्या शेअरमध्ये घसरण झाली होती. परंतु आता कंपनीचा शेअर सावरताना दिसत आहे. दरम्यान, पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी नुकतंच इंडिया इंटरनेट डे २०२४ आणि उद्योजकांच्या मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी नव उद्योजकांना आवश्यक पैलू, त्यातील बारकावे, कटिबद्धता आणि कोणत्या क्षेत्रांकडे प्रामुख्यानं लक्ष द्यावं याविषयी मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी आपल्या आजवरच्या प्रवासात आलेले चढ-उतार आणि त्यातून शिकलेल्या गोष्टी सर्वांसोबत शेअर केल्या.
वन ९७ सुरू केल्यानंतर आपल्याला सात वर्षे व्हिसीदेखील मिळाले नव्हते असं शर्मा यांनी सांगितलं. "गुंतवणूकदारांना विश्वास मिळवणं कठीण होतं. सुरुवातीच्या काळात पेटीएम बूटस्ट्रॅप होती. कोणत्याही स्टार्टअपसाठी टिकून राहण्याची गुरुकिल्ली ही रोख प्रवाह व्यवस्थापित करणं हेच आहे," असं शर्मा म्हणाले. "प्रॉफिट आणि लॉस नावाचं काही नाही. रोख प्रवाह हेच सत्य आहे. तुम्ही व्यवसाय सुरू ठेवू शकता की नाही हे रोख ठरवते. जशा कंपन्या मॅच्युअर होत जाते, तसं त्यांचं लक्ष कायम रोखीवर जातं," असंही त्यांनी नमूद केलंय.
२०२१ मध्ये आलेला आयपीओ
पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सचा आयपीओ नोव्हेंबर २०२१ मध्ये आला होता. या आयपीओची इश्यू प्राइस २१५० रुपये होती. आयपीओ १८ नोव्हेंबर २०२१ रोजी त्याच्या इश्यू प्राइसपेक्षा ९ टक्के डिस्काऊंटसह सूटीसह लिस्ट झाला. लिस्टिंगच्या दिवशी हा शेअर आणखी घसरून १५६४ रुपयांवर बंद झाला. लिस्टिंग होऊन जवळपास ३ वर्षे उलटली तरी हा शेअर आयपीओ इश्यू प्राइसला स्पर्श करू शकलेला नाही. तर, यंदा हा शेअर ३५० रुपयांपर्यंत घसरला होता. सध्या या शेअरची किंमत ६७२.४० रुपये आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)