Join us  

"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 1:23 PM

पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सचा उल्लेख भारतीय शेअर बाजाराच्या अयशस्वी आयपीओंमध्ये केला जातो. ज्या गुंतवणूकदारांना या आयपीओ अंतर्गत शेअर्स अलॉट झाले, त्यांचं मोठं नुकसान झालंय.

पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सचा उल्लेख भारतीय शेअर बाजाराच्या अयशस्वी आयपीओंमध्ये केला जातो. ज्या गुंतवणूकदारांना या आयपीओ अंतर्गत शेअर्स अलॉट झाले, त्यांचं मोठं नुकसान झालंय. अशा गुंतवणूकदारांना आजही तोटा सहन करावा लागत आहे. आता पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी पहिल्यांदाच आयपीओच्या फ्लॉप शोमध्ये आपली चूक बोलून दाखवली आहे.

काय म्हणाले शर्मा?

"आम्ही पेटीएमच्या आयपीओसाठी योग्य बँकर निवडला नाही. योग्य बँकर निवडणं आवश्यक आहे. देवाच्या मंदिरासाठी तुम्हाला योग्य पुजारी हवा असतो. आम्हीही कदाचित त्याची निवड योग्यरित्या केली नाही," असं विजय शेखर शर्मा म्हणाले. यासोबतच त्यांनी उद्योजकांना योग्य बँकर निवडण्याचाही सल्ला दिला.

शर्मा यांनी याची तुलना आयटी कंपनी इन्फोसिसशीदेखील केली. एनआर नारायण मूर्ती यांच्या काळात त्यांच्या ड्रायव्हरनं एक कोटी रुपये कमावले होते, परंतु जेव्हा पेटीएम लिस्ट झाली तेव्हा किमान २० लोकांनी १०० कोटी रुपये कमावले. बँकर्सच्या चांगल्या मार्गदर्शनामुळे आणखी चांगले परिणाम मिळू शकले असते, अशी कबुली शर्मा यांनी दिली. आयसीआयसीआय बँक, जेपी मॉर्गन, गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅनली, एचडीएफसी बँक, सिटी आणि अॅक्सिस कॅपिटल या आय-बँकांनी पेटीएमआयपीओचे व्यवस्थापन केलं होतं.

२०२१ मध्ये आलेला आयपीओ

पेटीएमची मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सचा आयपीओ नोव्हेंबर २०२१ मध्ये आला होता. या आयपीओची इश्यू प्राइस २१५० रुपये होती. आयपीओ १८ नोव्हेंबर २०२१ रोजी त्याच्या इश्यू प्राइसपेक्षा ९ टक्के डिस्काऊंटसह सूटीसह लिस्ट झाला. लिस्टिंगच्या दिवशी हा शेअर आणखी घसरून १५६४ रुपयांवर बंद झाला. लिस्टिंग होऊन जवळपास ३ वर्षे उलटली तरी हा शेअर आयपीओ इश्यू प्राइसला स्पर्श करू शकलेला नाही. तर, यंदा हा शेअर ३५० रुपयांपर्यंत घसरला होता. सध्या या शेअरची किंमत ६७२.४० रुपये आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :पे-टीएमइनिशिअल पब्लिक ऑफरिंग