Stock Market : मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात कमजोर झाली. BSE सेन्सेक्स २७३.८२ अंकांनी घसरला आणि ८१,४७४.७५ अंकांवर उघडला. त्याचवेळी, NSE निफ्टी देखील ७४.६० अंकांच्या घसरणीसह २४,५९३.६५ अंकांवर व्यवहार करत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला असून जागतिक बाजारात विक्रीचा परिणाम भारतीय बाजारावर दिसत आहे. जर आपण घसरलेल्या शेअर्सवर नजर टाकली तर, सनफार्मा, हिंदूनिल व्ही आर, टायटन, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी बँक सारख्या हेवीवेट समभागांचा समावेश आहे.
त्याच वेळी, टाटा मोटर्स, सनफार्मा, टेकएचएम, टीसीएस आणि आयसीआयसीआय बँकमध्ये किंचित वाढ दिसून येत आहे. वर्षाचा शेवटचा महिना आणि यूएस फेडरल रिझर्व्हच्या घोषणेपूर्वी गुंतवणूकदार सावध पावलं टाकत आहे.
जागतिक स्तरावर कमकुवत ट्रेंड दरम्यान, सोमवारी स्थानिक शेअर बाजारात घसरण झाली. BSE सेन्सेक्स ३८४ अंकांनी घसरला. रुपयाची घसरण आणि चीनकडून आलेली कमकुवत आर्थिक आकडेवारी यामुळे धातू आणि आयटी शेअर्समध्ये विक्रीचा दबाव आल्याने गुंतवणूकदारांच्या भावनांना फटका बसला. बीएसईचा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स ३८४.५५ अंकांनी घसरून ८१,७४८.५७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १००.०५ अंकांच्या घसरणीसह २४,६६८.२५ अंकांवर बंद झाला. बाजार तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह या आठवड्यात धोरणात्मक दराचा निर्णय घेईल. हे पाहता गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा अवलंब केल्यामुळे जागतिक बाजार नरमला आहे.