सध्या शेअर बाजारात ट्रेडिंग (Share Market Trading) करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जे जुने गुंतवणूकदार आहेत ते आयपीओ किंवा प्रायमरी मार्केटद्वारे शेअर बाजारातगुंतवणूक करतात. परंतु नव्यानं येणारे गुंतवणूकदार फ्युचर्स अँड ऑप्शन ट्रेडिंगमध्ये (F&O Trading) हात आजमावत आहेत. त्यामुळेच डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगमध्ये भारत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. परंतु एफ अँड ओ ट्रेडिंग देखील सोपं नाही.
भांडवली बाजार सेबीच्या नियामक सेबीनं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार दहापैकी नऊ गुंतवणूकदार आपले हात पोळून घेत असल्याचं दिसून आलं आहे. म्हणजे त्यांना तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळेच केंद्र सरकारनं गुंतवणूकदारांना आपल्या जोखमीबाबत इशारा दिलाय. सरकार त्याबाबत सावध का आहे, हे जाणून घेऊया.
F&O ट्रेडिंग काय आहे?
इक्विटी मार्केटमध्ये दोन सेगमेंट असतात. यापैकी एक म्हणजे कॅश सेगमेंट. दुसरा म्हणजे डेरिव्हेटिव्ह सेगमेंट. याला फ्युचर्स अँड ऑप्शन्स किंवा एफ अँड ओ सेगमेंट असंही म्हणतात. एफ अँड ओ हे एक डेरिव्हेटिव्ह इन्स्ट्रूमेंट आहे. यामध्ये ट्रेडर एखाद्या इंडरलाइंग असेटवर पहिल्यापासून निश्चित असलेल्या किंमकीवर काँट्रॅक्ट खरेदी किंवा विक्री करतो. नावाप्रमाणेच, डेरिव्हेटिव्ह्स ही फायनान्शिअल प्रोडक्ट्स आहेत, जी स्टॉक्स, बाँड्स, कमोडिटीज सारख्या इतर अंडरलाइंग असेट त्यांचं मूल्य प्राप्त करतात.
F&O व्यवहार काय आहे?
फ्युचर्स डील्सअंतर्गत ट्रेडर भविष्यातील तारखेला सध्याच्या किंमतीवर शेअरची खरेदी किंवा विक्री करू शकतो. त्याचप्रमाणे ऑप्शन डील अंतर्गत ग्राहकाला भविष्यासाठी ठरवून दिलेल्या किमतीत शेअर खरेदी-विक्रीचा अधिकार मिळतो. मात्र, तो एकाच तारखेला शेअर्सची खरेदी-विक्री करतोच असं नाही.
एफ अँड ओची उलाढाल किती?
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या म्हणण्यानुसार, मार्च २०२० (कोरोना महासाथीपूर्वी) आणि मार्च २०२४ दरम्यान मासिक डेरिव्हेटिव्ह उलाढाल ३० पटीने वाढली. ती २४७.५ लाख कोटी रुपयांवरून ७,२१८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. बीएसईवर मार्च २०२० मध्ये सुमारे १ लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या विभागाची एकूण उलाढाल १,५१९ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. यात १५०० पटीनं वाढ झाली आहे. कॅश सेगमेंटपेक्षा हे प्रमाण जास्त आहे.
कोणत्या उद्देशानं वापर केला जातोय?
टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार एफ अँड ओ ट्रेडिंगचा वापर प्रामुख्यानं शेअर बाजारात झटपट पैसे कमावण्यासाठी एक सट्टा म्हणून केला जात आहे. परंतु वास्तव हे आहे की बहुतेक किरकोळ गुंतवणूकदारांचे पैसे बुडत आहेत. जानेवारी २०२३ मध्ये सेबीने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला. एफ अँड ओ स्पेसमधील ८९ टक्के लोक पैसे गमावत होते. याचा अर्थ असा की १० पैकी केवळ एका व्यक्तीनं पैसे कमावले. परंतु एफ अँड ओ ट्रेडिंग वॉल्यूममध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे बाजारातील दिग्गजांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
खरी चिंता काय आहे?
किरकोळ गुंतवणुकदारांच्या वाढत्या सहभागामुळे मोठ्या प्रमाणात फ्रॉड ऑपरेटरही बाजारात आले आहेत. ते जास्त आणि अनुचित फायदा दाखवून लोकांना एफ अँड ओ ट्रेडिंगमध्ये गुंतण्यासाठी सामील करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ते अनेकदा सेलिब्रिटी आणि बड्या गुंतवणूकदारांचे फोटो आणि व्हिडीओ वापरतात. किरकोळ गुंतवणूकदारांना त्यांच्या शिफारशींनुसार ट्रेडिंगसाठी फसवण्यासाठी ते मोठ्या नफ्याचे स्क्रीनशॉट (ज्याला बनावट नफा आणि तोटा किंवा पी अँड एल स्क्रीनशॉट म्हणतात) देखील वापरतात. अशा प्रकारे किरकोळ गुंतवणूकदार त्यांच्या जाळ्यात अडकतात आणि त्यांच्या ठेवी गमावतात.