इक्विटी आणि डेट इन्स्ट्रुमेंट्सच्या माध्यमातून भांडवली बाजारातून उभारण्यात आलेल्या एकूण निधीत २०२४-२५ या आर्थिक वर्षात सुमारे २१ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. ही रक्कम आर्थिक वर्ष २०२४ मधील ११.८ लाख कोटी रुपयांवरून १४.२७ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. एसबीआय लवकरच २५० रुपयांची एसआयपी सुरू करणार असल्याची माहिती सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांनी शुक्रवारी दिली.
९ महिन्यांत १०.७ लाख कोटी रुपये जमा
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत शेअर बाजारातून ३.३ लाख कोटी रुपये, डेट मार्केटमधून ७.३ लाख कोटी रुपये उभे करण्यात आले असून, एकूण रक्कम १०.७ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, याकडे माधबी पुरी बुच यांनी लक्ष वेधलं.
जर आपण पुढील तिमाहीचा (चौथ्या तिमाहीचा) अंदाज लावला तर हा आकडा १४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे, ज्यात इक्विटी आणि डेट दोन्ही बाजारातून उभारलेल्या रकमेचा समावेश आहे.
रिअल इस्टेट अँड इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचं योगदान घटणार
रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (आरईआयटी), इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (इनव्हिट) आणि म्युनिसिपल बाँड्सच्या माध्यमातून उभारलेल्या निधीचं योगदान एकूण भांडवल उभारणीत खूपच कमी आहे, असं माधबी पुरी बुच यांनी सांगितलं. आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या नऊ महिन्यांत त्यांच्याकडून केवळ १०,००० कोटी रुपये उभे करण्यात आले आहेत. मात्र, पुढील दशकात या क्षेत्रात वाढ होईल आणि इक्विटी तसंच डेट मार्केटमधून उभारलेल्या निधीला मागे टाकू शकेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
आयपीओवरही भाष्य
आयपीओवर अधिक लक्ष दिलं जात आहे. सेबीला मोठ्या प्रमाणात आयपीओसाठी अर्ज मिळत आहेत. अशी प्रतिक्रिया माधबी पुरी बुच यांनी दिली. याशिवाय सेबीनं साईट्स इश्यू तेजीनं पूर्ण करण्यासाठी एक प्रणाली विकसित केली आहे आणि उद्योग क्षेत्रांना ती आत्मसाद करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
२५० रुपयांची एसआयपी
सेबी म्युच्युअल फंडांच्या नवीन प्रस्तावांना वेगाने मंजुरी देत आहे. कमीत कमी २५० रुपयांची सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एसबीआय लवकरच २५० रुपयांची एसआयपी आणणार आहे.