रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) टाटा सन्सला (TATA Sons) अप्पर लेयर एनबीएफसीच्या श्रेणीत टाकल्याची बातमी तुम्हाला माहिती असेलच. त्यानंतर कंपनीला आयपीओ आणून शेअर बाजारात लिस्ट होणं आवश्यक बनलं आहे. सध्याच्या नियमानुसार टाटा सन्सला बाजारात सूचीबद्ध होण्यासाठी सप्टेंबर २०२५ पर्यंतची मुदत आहे. मात्र, टाटा सन्सने रिझर्व्ह बँकेकडे यातून सूट मिळावी, अशी विनंती केली आहे.
ईटीनं दिलेल्या वृत्तानुसार, टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सनं २०,००० कोटी रुपयांचं कर्ज फेडलंय. यासोबतच त्यांनी स्वेच्छेनं रिझर्व्ह बँकेकडे नोंदणी प्रमाणपत्र सादर केले आहे. टाटा सन्सच्या या निर्णयाकडे लिस्टेड न राहण्याचा धोरणात्मक प्रयत्न म्हणून पाहिलं जातंय. पण आता रिझर्व्ह बँकेच्या पुढील पावलाकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
सप्टेंबर २०२५ पर्यंतची मुदत
आरबीआयच्या एसबीआर म्हणजेच स्केल बेस्ड रेग्युलेशन नियमांनुसार (SBR) टाटा सन्सला पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत शेअर बाजारात लिस्ट व्हावं लागेल. आरबीआयनं सप्टेंबर २०२२ मध्ये ही मार्गदर्शक तत्त्वं सादर केली आहेत आणि अपर लेयर एनबीएफसीला तीन वर्षांच्या आत लिस्ट व्हावं लागणार असल्याचं म्हटलं. पण आता टाटा सन्सनं यातून सूट देण्याचं आवाहन केलं आहे.
लिस्टिंग न होण्याचे काही लाभ?
टाटा सन्सचं नियंत्रण सार्वजनिक धर्मादाय ट्रस्टद्वारे केलं जातं, जे अशा मालकी संरचनांना प्रतिबंधित करणाऱ्या ट्रस्ट कायद्यांशी विरोधाभासी असू शकतात.. याव्यतिरिक्त, टाटा सन्सची असोसिएशन ऑफ आर्टिकल्स टाटा ट्रस्टला संचालक मंडळाच्या निर्णयांवर महत्त्वपूर्ण नियंत्रण देते. लिस्टेड कंपन्यांमध्ये याला परवानगी नसेल. बजाज हाऊसिंग फायनान्स, आदित्य बिर्ला फायनान्स आणि एल अँड टी फायनान्ससह सर्व अप्पर लेयर एनबीएफसी आरबीआयनं ठरवून दिलेल्या लिस्टिंग नियमांचे पालन करत आहेत. टाटा सन्सला सूट दिल्यास समस्या निर्माण करणारं उदाहरण तयार होऊ शकतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यामुळे नियामक चौकटीतही समस्या निर्माण होऊ शकतात आणि भारताच्या भांडवली बाजारात समान संधी बिघडू शकते.
५५ हजार कोटींचा आयपीओ
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा सन्स आयपीओच्या माध्यमातून ५५,००० कोटी रुपये उभारण्याची योजना आखत असल्याचं म्हटलं होतं. अलीकडेच या बातमीनंतर टाटा समूहातील कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती वाढल्या होत्या. टाटा केमिकल्स, टाटा मोटर्स आणि टाटा स्टीलसह या कंपन्यांची टाटा सन्समध्ये मोठी इक्विटी आहे आणि त्यांनी प्रचंड नफा कमावला आहे. मात्र, टाटा सन्सनं सवलतीची विनंती केल्यानं त्यांच्या समभागांच्या किमती घसरल्या असून, आयपीओतून परताव्याची अपेक्षा असलेल्या भागधारकांमध्ये निराशा पसरली आहे.