Join us

Stock Market Fall Reasons: शेअर मार्केट घसरणीला नेमका कधी लागणार ब्रेक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 19:27 IST

Stock market fall reason in india: येत्या गुरुवारी युरोपियन बँकेच्या व्याजदरांची घोषणा होणार आहे. त्याकडेही बाजाराचे लक्ष आहे.

पाच महिने सातत्याने घसरण होत असलेल्या बाजाराची नजर आगामी सप्ताहात जाहीर होणाऱ्या जीडीपीची आकडेवारी, वाहन विक्री व पीएमआयची आकडेवारीकडे असेल. जर यात काही चांगली बाब नजरेस आल्यास त्याला बाजाराकडून चांगला प्रतिसाद लाभून घसरणीला 'ब्रेक' लागू शकतो.

या सप्ताहात अमेरिका, चीन, जपान आणि इंग्लंड यांच्या जीडीपीची आकडेवारी जाहीर होईल. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या व्यापारविषयक धोरणात काय बदल केले जातात याकडेही नजर लागून आहे. येत्या गुरुवारी युरोपियन बँकेच्या व्याजदरांची घोषणा होणार आहे. त्याकडेही बाजाराचे लक्ष आहे.

भारतीय बाजारातून १.१२ लाख कोटी काढले

गेले काही महिने बाजारातून पैसे काढून घेण्याचा सपाटा लावलेल्या परकीय वित्तसंस्थांनी सन २०२५च्या पहिल्या दोन महिन्यांतच भारतीय बाजारातून १.१२ लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत.

मात्र, देशांतर्गत वित्तीय संस्थांकडून बाजाराला चांगले पाठबळ मिळत असले तरी बाजारातील पडझड मात्र थांबू शकली नाही. फेब्रुवारी महिन्यामध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतातील शेअर बाजारांमधून ३४ हजार ५७४ कोटी रुपये काढून घेतले आहेत.

जानेवारीत या संस्थांनी ७८ हजार २७ कोटींच्या समभागांची विक्री केली होती. कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या २ महिन्यांत संस्थांनी १ लाख १२ हजार ६०१ कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत.

परकीय वित्तीय संस्थांची भूमिका महत्त्वाची

भारतामधून काढलेली रक्कम ही अमेरिकेमध्ये गुंतविली जात आहे. जगभरातील अस्थिरता ही या संस्थांना अमेरिकेमध्ये खेचत आहे. मजबूत झालेला डॉलर आणि अमेरिकेत बॉण्डसवरील वाढलेला परतावा या बाबीही कारणीभूत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून विक्री करत असलेल्या परकीय वित्तसंस्था काय भूमिका घेतात यावरही बाजाराचे लक्ष असेल. या संस्था खरेदीसाठी उतरल्यास बाजार वर जाऊ शकेल.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकपरकीय गुंतवणूक