Join us

बुल रन उधळला! बाजार ६० हजारांवर; गुंतवणूकदार मालामाल, सलग चौथी उसळी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 12:03 PM

ज्या गुंतवणूकदारांनी बाजार पडझडीच्या दरम्यान आपली गुंतवणूक काढून न घेता त्यात वाढ केली, ते गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

मुंबई : जागतिक बाजार महागाईने बेजार असताना भारतात अर्थव्यवस्था मात्र भक्कम होत चालली आहे. यामुळे विदेशी गुंतवणूकदार पुन्हा एकदा गुंतवणुकीसाठी भारताकडे वळले आहेत. यामुळे बुधवारी शेअर बाजाराने सलग चौथी उसळी घेत चार महिन्यांनंतर ६० हजारांचा आकडा पुन्हा एकदा पार केला आहे.

ज्या गुंतवणूकदारांनी बाजार पडझडीच्या दरम्यान आपली गुंतवणूक काढून न घेता त्यात वाढ केली, ते गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ४१७.९२ अंकांनी वाढ होत ६०,२६०.१३ अंकांवर बंद झाला. तो एकावेळी ४८१ अंकापर्यंत वाढला होता. त्याचवेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ११९ अंक म्हणजेच ०.६८ टक्क्यांनी वाढून १७,९४४ अंकांवर बंद झाला. 

शेअर बाजार का वाढतोय? 

  • विदेशी गुंतवणूकदारांची सतत होत असलेली गुंतवणूक
  • जगभरात वाढत असलेली महागाई
  • भारतीय अर्थव्यवस्था अतिशय गतीने वाढत असल्याचे कारण
  • कच्च्या तेलाच्या दरात झालेली घसरण

कच्चे तेल ९३ डॉलर प्रती बॅरलवरजगभरात महागाई वाढत असून, उत्पादनावर परिणाम होत आहे. त्याचा परिणाम तेलाचे दर कमी होत आहेत. बुधवारी कच्च्या तेलाच्या दरात ०.१३ टक्क्यांनी घट होत ९२.२२ डॉलर प्रती बॅरलवर आले आहेत. देशात पेट्रोल-डिझेलची मागणी ७.७१ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. ही मागणी जगातील कोणत्याही देशापेक्षा अधिक आहे.

विदेशी गुंतवणूक ५२३ अब्ज डॉलरवर 

विदेशी गुंतवणूकदारांनी जून तिमाहीमध्ये भारतीय शेअर बाजारात १४ टक्क्यांनी कमी गुंतवणूक केली असून, ती आता ५२३ अब्ज डॉलरवर आली आहे. ही सलग तिसरी तिमाही आहे, ज्यामध्ये एफपीआयने भारतीय शेअर बाजारातील हिस्सेदारी कमी केली आहे. जागतिक आणि देशांतर्गत चिंताजनक घटनांनंतर गुंतवणूकदारांची चिंता आणखी वाढली आहे.

टॅग्स :शेअर बाजारव्यवसाय