foreign investors : गेल्या ३ महिन्यांपासून भारतीय शेअर बाजार सातत्याने घसरत आहे. म्हणजे ऑक्टोबरमध्ये ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचलेला बाजार आता नीचांकी पातळीवर घसरत आहे. गुंतवणूकदारांसाठी हा सापशिडीचा खेळ झाला आहे. कधी वर जाईल आणि कधी शेपटातून खाली जाईल, काही सांगता येत नाही. भारतीय शेअर बाजार घसरण्यामागे परकीय गुंतवणूकदारांची विक्री हे मोठं कारण आहे. ऑक्टबर महिन्याच्या सुरुवातीपासून परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार बाजारातून पैसा काढून घेत आहे. परिणामी शेअर्सला उठण्याची संधीच मिळत नाही. यात अनेक दिग्गज स्टॉक्सही देशोधडीला लागलेत. पण, अशी अचानक परकीय गुंतवणूकदारांनी बाजाराकडे पाठ का फिरवली?
भारतीय बाजारपेठेत विदेशी गुंतवणूकदारांचा मोठा वाटा आहे. परंतु, अलीकडच्या काळात विदेशी गुंतवणूकदारांचं आउटगोईंग वाढलं आहे. केवळ जानेवारीबद्दल बोलायचे झाले तर, एनएसडीएलच्या आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात बाजारातून ७७ हजार कोटी रुपयांची विक्री केली आहे. परदेशी गुंतवणूकदार आपला पैसा भारतीय बाजारातून काढून इतर देशांच्या बाजारात गुंतवत आहेत.
परकीय गुंतवणूकदार पैसे का काढत आहेत?
जानेवारी २०२५ मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून ७७,००० कोटी रुपयांहून अधिकची विक्री केली आहे. गेल्या ३ महिन्यांत १.७७ लाख कोटी रुपये काढून घेण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, परकीय गुंतवणूकदारांचे प्राधान्य उच्च परतावा आहे. बाजारातील स्थिरता, तरलता आणि कराशी संबंधित गोष्टी पाहूनच विदेशी गुंतवणूकदार बाजारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात.
डॉलर मजबूत तर रुपयाची घसरण
गेल्या २० वर्षांत, निफ्टीने दरवर्षी सरासरी १४.५% परतावा दिला आहे, जो खूपच आकर्षक दिसत आहे. पण डॉलरमध्ये पाहिल्यावर तो नगण्य दिसतो. कारण २० वर्षांपूर्वी १ डॉलरची किंमत ४० रुपये होती. परंतु, आता त्याची किंमत ८७ रुपये आहे. म्हणजेच रुपयाचे मूल्य निम्म्याहून अधिक कमी झाले आहे. दुसरीकडे, FII डॉलरमध्ये गुंतवणूक करतात आणि डॉलरमध्येच पैसे काढतात, त्यामुळे या घसरणीचा त्यांच्या परताव्यावर परिणाम होतो. FII ला डॉलरचा फायदा होतो, त्यामुळे रुपया घसरल्यावर ते पैसे काढून घेतात. कारण त्यांना तेवढा परतावा मिळत नाही.
रुपयाच्या घसरणीव्यतिरिक्त परकीय गुंतवणूकदारांची भारतात आणखी एक अडचण आहे. भारताची करप्रणाली. भारतात गुंतवणूक केल्यावर विदेशी गुंतवणूकदारांना १२.५ टक्के दीर्घकालीन लाभ कर (गेन टॅक्स) भरावा लागतो. त्याचबरोबर अमेरिकेत गुंतवणूक करताना त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. आता नवीन आयकर कायद्यात यात बदल होणार का? हे पाहावे लागणार आहे.