Join us

Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 2:40 PM

Loksabha Election Share Market Impact : लोकसभा निवडणूक आणि शेअर बाजार यांचा जवळचा संबंध आहे. सध्याही शेअर बाजारात मोठे चढ उतार दिसून येत आहेत.

लोकसभा निवडणूक (Loksabha Election) आणि शेअर बाजार यांचा जवळचा संबंध आहे. निवडणुका जाहीर होताच शेअर बाजारात प्रतिक्रिया उमटत असून, त्यामुळे चढ-उतार होताना दिसत आहेत. यंदाही तशीच स्थिती आहे. बाजारात चढ-उतार सुरूच आहेत. परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढून घेत आहेत. यामुळे बाजारात मोठी घसरण होताना दिसतेय. त्याचबरोबर देशांतर्गत गुंतवणूकदार बाजाराला आधार देत आहेत. मात्र, बाजारात भीतीचं वातावरण पसरल्याचं दिसून येतंय. तुम्हीही शेअर बाजारातील गुंतवणूकदार असाल तर जाणून घेतलं पाहिजे की जेव्हा जेव्हा लोकसभा निवडणुका झाल्या आहेत, त्यावेळी शेअर बाजारात असंच दृश्य पाहायला मिळालंय. गेल्या काही निवडणुकांतील बाजाराच्या हालचालींवरून बाजाराचा मूड पुढे कसा असेल हे समजून घेऊ. 

२०१४ निवडणुकांपूर्वी होती तेजी 

२०१४ मध्ये ७ एप्रिल ते १२ मे या कालावधीत नऊ टप्प्यांत लोकसभा निवडणुका झाल्या होत्या आणि १६ मे रोजी निकाल जाहीर झाला होता. निवडणूक सुरू होण्यापूर्वी शेअर बाजारात मोठी उसळी दिसून आली होती. १० फेब्रुवारीला निफ्टी ६,०४१ अंकांवर होता, जो ७ एप्रिलपर्यंत ६,७७६ अंकांवर पोहोचला. या कालावधीत सेन्सेक्स २०,४१४ अंकांवरून २२,६२८ अंकांवर पोहोचला. ७ एप्रिल ते २८ एप्रिल या पुढील तीन आठवड्यांत निफ्टी २०० अंकांनी तर सेन्सेक्स ५०० अंकांच्या श्रेणीत बंद झाला. २८ एप्रिल ते १९ मे या कालावधीत बाजारात पुन्हा एकदा मोठी तेजी दिसून आली. निफ्टी ७,३६७ अंकांवर पोहोचला. या दरम्यान सेन्सेक्सही २४,६९३ अंकांवर पोहोचला. 

२०१९ च्या निवडणुकांनंतर घसरण 

२०१९ मध्ये लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडली. पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिल रोजी तर सातव्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी पार पडले. त्याचा निकाल २३ मे रोजी जाहीर झाला. निवडणूक सुरू होण्यापूर्वी बाजारात मोठी तेजी दिसून आली. निफ्टी १८ फेब्रुवारीरोजी १०,७३८ वरून १५ एप्रिलला ११,७५२ वर पोहोचला. याच कालावधीत सेन्सेक्स ३५,८२० अंकांवरून ३९,१४० अंकांवर पोहोचला. 

पुढील तीन आठवडे म्हणजे १५ एप्रिल ते ६ मे या कालावधीत बाजारात घसरण पाहायला मिळाली. या कालावधीत निफ्टी ११,२७८ अंकांवर तर सेन्सेक्स ३७,४६२ अंकांवर घसरला. पण पुढील तीन आठवडे म्हणजे २७ मे पर्यंत बाजारात तेजी आली, ज्यामुळे निफ्टी ११,९२२ अंकांवर आणि सेन्सेक्स ३९,७१४ अंकांवर आला. 

India vix मध्ये तेजी होती 

लोकसभा निवडणुकीदरम्यान बाजारातील चढउतार दाखवणाऱ्या India vix लक्षणीय वाढ दिसून येते. २०१४ मध्ये इंडिया व्हीआयएक्स निवडणुकीच्या २२ दिवस आधी वाढू लागला. तर २०१९ मध्ये हा ट्रेंड ३५ दिवसांपूर्वी पाहायला मिळाला होता. यावेळीही India vix मध्ये तेजी आहे. तो १८.४७ वर पोहोचला आहे. भारतीय व्हीआयएक्सच्या वाढीमुळे बाजारात अस्थिरता दिसून येईल. यंदा १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यांत मतदान होत आहे. ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. 

निवडणुकीपूर्वी होती तेजी 

यंदाही निवडणुकीपूर्वी बाजारात सुरुवातीलाच तेजी दिसून आली. २० मार्च रोजी निफ्टी २१,८३९ अंकांवर होता, जो १० एप्रिल रोजी २२,७५३ अंकांवर पोहोचला. याच कालावधीत सेन्सेक्स ७२,१०१ अंकांनी वधारून ७५,०३८ अंकांवर पोहोचला. त्यानंतर बाजारात घसरण झाली आणि १८ एप्रिलपर्यंत निफ्टी आणि सेन्सेक्स अनुक्रमे २१,९९५ आणि ७२,४८८ अंकांवर घसरले. त्यानंतर निफ्टी २२,७५० ते २२,८०० अंकांच्या दरम्यान तर सेन्सेक्स ७२,००० ते ७५,१०० अंकांच्या दरम्यान व्यवहार करत आहे.

टॅग्स :लोकसभाशेअर बाजार