Stock Market Crash Reason: सप्टेंबर महिन्यात ऐतिहासिक उच्चांकांवर पोहचलेला शेअर बाजार पत्त्यांचा बंगला कोसळावा तसा कोसळत आहे. बाजारात (Stock Market) दररोज होत असलेल्या प्रचंड घसरणीने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. याआधी मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये घसरण दिसून येत होती. पण आता हेवीवेट शेअर्स म्हणजेच लार्ज कॅप शेअर्समध्ये घसरण सुरू झाली आहे. गेल्या महिनाभरापासून बाजारात सुरू असलेल्या घसरणीमुळे ही घसरण आणखी वाढण्याची भीती नव्या आणि जुन्या गुंतवणूकदारांना वाटत आहे. ही घसरण कधी थांबणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
बुधवारी सकाळी ११.२५ वाजता निफ्टी ५० १७० अंकांनी घसरून २३७१४ वर व्यवहार करत होता. तर सेन्सेक्स ४५२ अंकांनी घसरून ७८,२२९ वर आला. निफ्टी बँक आणि इतर निर्देशांकही घसरले आहेत. गेल्या एका महिन्यात निफ्टी निर्देशांक १४०० अंकांनी घसरला आहे. तर एका आठवड्यात ६३० अकांनी घसरण झाली आहे. तर सेन्सेक्स ३७७० अंकांनी खाली आला. एका आठवड्यात १५०० अंक किंवा २ टक्क्यांची घसरणीची नोंद झाली.
४५ लाख कोटींचे नुकसानगेल्या महिन्यात २७ सप्टेंबर रोजी BSE मार्केट कॅप ४७७ लाख कोटी रुपये होते, जे आता १३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ४३२ लाख कोटी रुपयांवर आली आहे. म्हणजेच या कालावधीत गुंतवणूकदारांच्या मूल्यांकनात ४५ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. सोप्या शब्दात गुंतवणूकदारांचे ४५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेअर बाजार का घसरतोय रोज?
- शेअर बाजारातील घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे बड्या कंपन्यांचे खराब तिमाही निकाल. रिलायन्सपासून ते एशियन पेंट्स आणि इंडसइंड बँकेपर्यंत निकालांनी सर्वांना निराश केलं आहे.
- दुसरे प्रमुख कारण म्हणजे यूएस 10 वर्षांच्या रोखे उत्पन्नात वाढ आणि डॉलर ४ महिन्यांत सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे आज CPI महागाई वाढू शकते. डॉलरच्या मजबूतीमुळे गुंतवणूकदारही चिंतेत आहेत. कारण ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेची मजबूत आर्थिक वाढ आणि आक्रमक व्यापार धोरणांमुळे महागाई वाढेल, अशी अपेक्षा तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
- काल ऑक्टोबर महिन्यातील किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून त्यात वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई ६.२१ टक्क्यांवर पोहोचली आहे. हे आरबीआयच्या ६ टक्के मर्यादेपेक्षा जास्त आहे. १४ महिन्यांनंतर महागाई इतकी वाढली आहे.
- विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून वेगाने पलायन करत आहेत. गेल्या महिन्यात शेअर बाजारातून १ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढण्यात आली. गेल्या आठवड्यात विदेशी गुंतवणूकदारांनी 20 हजार कोटी रुपये काढून घेतले होते. भारतीय बाजारातून पैसे काढण्याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेतील तेजी आणि ट्रम्प यांच्या आगमनाने गुंतवणूकदार जागतिक बाजारपेठेकडे अधिक आकर्षित होत आहेत.
- जागतिक बाजारातही काल रात्री घसरण झाली. अमेरिकन बाजारापासून ते युरोप, जपान आणि चिनी शेअर बाजारातही घसरण दिसत होती. त्यामुळे भारतीय शेअर बाजारही आज दबावाखाली असल्याचे दिसून येत आहे.
शेअर बाजार कधी सावरणार?
शेअर बाजारातील रिकव्हरीबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतीय बाजारात बरीच सुधारणा झाली आहे. बाजार कधीही भक्कम पाय रोवू शकतो आणि वाढ होऊ शकते. शेअर बाजार उच्च पातळीपासून खूप खाली आला आहे. उदाहरणार्थ, निफ्टीची ५२ आठवड्यांची उच्च पातळी २६,२७७.३५ वरून २३,६७७.६० अंकांवर आली आहे.