Join us  

Jio Finn, Zomato निफ्टी ५० मध्ये येणार का? NIFTY 50 मध्ये येण्याचा फॉर्म्युला काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 3:05 PM

Shares Nifty 50 : निफ्टी ५० मध्ये कामगिरीच्या आधारे वेळोवेळी नवीन कंपन्या एन्ट्री करतात आणि काही कंपन्या या निर्देशांकाबाहेरही असतात. कोणत्या आधारावर यात कंपन्यांचा समावेश होतो हे आपण आज जाणून घेऊ.

Shares Nifty 50 : निफ्टी ५० निर्देशांक हा देशातील टॉप ५० कंपन्यांचा निर्देशांक आहे, ज्यात मार्केट कॅप आणि त्यांच्या कामगिरीच्या आधारे या निर्देशांकात स्थान देण्यात येतं. निफ्टी ५० मध्ये कामगिरीच्या आधारे वेळोवेळी नवीन कंपन्या एन्ट्री करतात आणि काही कंपन्या या निर्देशांकाबाहेरही असतात. निफ्टी ५० निर्देशांकात दोन कंपन्यांचा समावेश होऊ शकतो. जिओ फायनान्शियल, झोमॅटो या कंपन्यांचा निफ्टी ५० मध्ये समावेश होऊ शकतो. तर एलटीआय माइंडट्री, डिव्हिस लॅब, आयशर यांना निर्देशांकातून वगळलं जाऊ शकते. 

जेएम फायनान्शियलनं नुकताच आपला एक नवा रिपोर्ट जाहीर कला. जर जिओ फायनान्शियल आणि झोमॅटोचा एफ अँड ओमध्ये समावेश झाला तर ते निफ्टी ५० मध्ये सामील होऊ शकतात. एलटीआय माइंडट्री, डिव्हिजन लॅब आणि आयशर यांना निफ्टी ५० मधून वगळलं जाऊ शकतं, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 

फ्युचर्स अँड ऑप्शन्स (एफ अँड ओ) ट्रेडसाठी पात्र असलेल्या शेअर्सच्या निकषांमध्ये प्रस्तावित बदलानंतर नवीन प्रवेश अपेक्षित आहे. सेबीनं अलीकडेच एफ अँड ओ शेअर्ससाठी कडक नियम प्रस्तावित केले आहेत, ज्यात ऑर्डर साईज आणि मार्केट वाइड पोझिशन लिमिटचा समावेश आहे. ईटीच्या रिपोर्टनुसार, काही रिसर्च अॅनालिस्टचा अंदाज आहे की या सेगमेंटमध्ये ७८ शेअर्स असण्याची शक्यता आहे. 

काय आहे निफ्टी ५०? 

निफ्टी ५० हा एक निर्देशांक आहे ज्यात भारतातील टॉप ५० लार्ज कॅप कंपन्यांचा समावेश आहे जे आपापल्या क्षेत्रात अव्वल आहेत. त्यामुळे भारतातील काही मोठ्या आणि नामांकित कंपन्याच या निर्देशांकाचा भाग बनतात. या टॉप ५० लार्ज कॅप कंपन्यांची निवड त्यांच्या फ्री-फ्लोट मार्केट कॅपच्या आधारे कशी केली जाते. निफ्टी ५० निर्देशांक हा भारतातील टॉप ५० लार्ज कॅप कंपन्यांचा बास्केट आहे आणि हा निर्देशांक एक काल्पनिक पोर्टफोलिओ म्हणून वापरला जातो जो भारतीय शेअर बाजारातील एकूण हालचाली प्रतिबिंबित करू शकतो. निफ्टी ५० मध्ये कोणताही बदल या निर्देशांकात समाविष्ट ५० कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत झालेल्या बदलामुळे होतो. 

कसं आहे कॅलक्युलेशन? 

निफ्टी ५० च्या पाईजचं कॅलक्युलेशन फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन पद्धतीचा वापर करून केलं जाते. निफ्टी ५० निर्देशांकाची किंमत शोधण्यासाठी निफ्टी ५० चा भाग असलेल्या सर्व शेअर्सचं सध्याचं बाजार भांडवल बेस पीरियडच्या मार्केट कॅपद्वारे विभागलं जातं. सध्याचे मार्केट कॅप हे सर्व ५० कंपन्यांचं वेटेड मार्केट कॅप आहे. फ्री फ्लोट शेअर्सला शेअरच्या बाजारभावानं गुणाकार करून त्याची गणना केली जाते. फ्री फ्लोट शेअर्समध्ये प्रवर्तक, सरकार, ट्रस्ट आदींकडे असलेले शेअर्स वगळता एकूण सर्व शेअर्सची संख्या दर्शवते. 

कशी केली जाते निवड? 

निफ्टी ५० निर्देशांकात कोणते ५० शेअर्स असावेत हे ठरवण्यासाठी काही नियम आहेत. येथे काही नियम आणि निकष आहेत ज्याच्या आधारे निफ्टी ५० शेअर्स ठरवले जातात. 

निफ्टी ५० युनिव्हर्स 

निफ्टी ५० चा भाग होण्यासाठी प्राथमिक निकष म्हणजे कंपनी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (एनएसई) लिस्ट असणं आवश्यक आहे. तसंच एनएसईच्या फ्युचर्स अँड ऑप्शन सेगमेंटमध्ये ट्रेडिंगसाठी कंपनीचे शेअर्स उपलब्ध असले पाहिजे. जर कंपनी एनएसईवर लिस्ट आणि व्यवहार करत नसेल तर ती निफ्टी ५० चा भाग होऊ शकत नाही. 

बेसिक स्ट्रक्चर 

एनएसईच्या टॉप ५० लार्ज कॅप कंपन्यांची निवड त्यांच्या फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारे केली जाते. फ्री-फ्लोट मार्केट कॅपची गणना एखाद्या कंपनीच्या शेअरच्या किमतीला बाजारात सहज उपलब्ध असलेल्या शेअर्सच्या संख्येनं गुणाकार करून केली जाते. उदाहरणार्थ, जर एखाद्या कंपनीचे बाजारात १ लाख शेअर्स सहज उपलब्ध असतील आणि प्रति शेअर किंमत ३० रुपये असेल तर कंपनीचे मार्केट कॅप ३० लाख रुपये मानलं जातं.

लिक्विडिटी 

निफ्टी ५० मध्ये शेअरचा समावेश होण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्याची लिक्विडिटी. म्हणजेच निफ्टी ५० निर्देशांकाचा भाग असलेले शेअर्स खरेदी-विक्री करणं सोपं असलं पाहिजे आणि अशा शेअर्सचं ट्रेडिंग व्हॉल्यूम जास्त असलं पाहिजे. 

स्टॉक रिबॅलन्सींग 

निफ्टी ५० निर्देशांकात ५० कंपन्या कायम राहतील याची शाश्वती नाही. दरवर्षी जून आणि डिसेंबरमध्ये हा निर्देशांक अर्धवार्षिक आधारावर रि बॅलन्स होतो. रि-बॅलन्सच्या प्रक्रियेद्वारे, निफ्टी ५० निर्देशांक त्यांचं मार्केट कॅप कमी झालेल्या किंवा निलंबित किंवा डीलिस्ट केलेल्या शेअर्सना काढून टाकतो. काढून टाकलेल्या शेअरच्या जागी वाढीव मार्केट कॅपच्या नव्या शेअर्सचा समावेश करण्यात येतो. या रि-बॅलन्सिंग प्रक्रियेमुळे आपोआप निफ्टी ५० च्या शेअरमध्ये उदयोन्मुख शेअर्सचा समावेश होतो.

टॅग्स :जिओझोमॅटोशेअर बाजार