- प्रसाद गो जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
रिझर्व्ह बँकेने वाढविलेल्या व्याजदरामुळे बाजारात विक्री वाढल्याने निर्देशांक खाली आले आणि गेल्या दोन सप्ताहांपासून सुरू असलेल्या वाढीला ब्रेक लागला. येणाऱ्या सप्ताहात बाजारात कनेक्शनची अपेक्षा असली तरी उत्तरार्धात बाजार सावरू शकतो. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून पतधोरण जाहीर करण्यात येणार आहे. आगामी सप्ताहात जाहीर होणारी भारत, अमेरिका, युरोप आणि इंग्लंडमधील महागाईची आकडेवारी जगभरातील बाजारांवर परिणाम करणार आहे. या आकडेवारीवर बाजाराची पुढची दिशा ठरणार आहे. रुपयाचा विनिमय दर तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचे दर याचाही बाजारावर प्रभाव पडू शकतो. बाजारातील करेक्शन यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबुन राहणार आहे.
गतसप्ताहात मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकात ६८६.८3 अंशांनी घसरण होऊन तो ६२.१८१.६७ अंशावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी मध्ये सुमारे दोनशे अंशांनी घट झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे निर्देशांकही घसरले.
...म्हणून बाजार सावरला
शेअर बाजारात गतसप्ताहात परकीय वित्तसंस्थांकडून मोठ्या प्रमाणावर विक्री झालेली दिसून आली. सप्ताहात या संस्थांनी ४३०५.97 कोटी रुपयांचे समभाग विकले. गेल्या महिन्यात या वित्तसंस्था खरेदीच्या मूडमध्ये दिसून आल्या होत्या. देशांतर्गत वित्तसंस्थांनी गतसप्ताहात ३७१२.०८ कोटी रुपयांची खरेदी करून बाजाराची घसरण काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.