- प्रसाद गो. जोशीदेशातील निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी होत असल्याने आगामी सरकारबाबतचे आडाखे बांधणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर कंपन्यांचे निकाल, पीएमआयची आकडेवारी, इंग्लंडमधील चलनवाढ व अर्थव्यवस्थेची तिमाही स्थिती, अमेरिकेतील शेतीच्या बेरोजगारीची स्थिती अशा अनेक बाबी बाजारावर परिणाम करणाऱ्या आहेत. आगामी काळातील घडामेाडींमुळे बाजार वर खाली होण्याची शक्यता असून बाजार खाली गेल्यास खरेदीसाठी सज्ज राहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आगामी सप्ताहामध्ये पीएमआयची आकडेवारी, मार्च महिन्यातील औद्योगिक उत्पादन आणि सुमारे ३०० कंपन्यांचे निकाल जाहीर होतील. या निकालामुळे त्या-त्या कंपनीच्या दरांवर परिणाम होऊ शकतील. गत सप्ताहामध्ये अनेक निर्देशांक वाढले असले तरी स्मॉलकॅप निर्देशांकामध्ये घट झाली आहे. आगामी सप्ताहात अनेक स्मॉलकॅप कंपन्यांचे निकाल येत असल्याने यामध्ये काही वाढ-घट होऊ शकते. चांगल्या कंपन्यांचे समभाग खरेदी करण्यासाठी तयार राहण्याची गरज आहे.
गुंतवणूकदार झाले श्रीमंतnगत सप्ताहामध्ये बाजार वाढीव पातळीवर बंद झाल्यामुळे गुंतवणूकदार २ लाख कोटींहून अधिक श्रीमंत झाले. या सप्ताहाच्या अखेरीस बाजारातील नांदणीकृत कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य ४,०६,२४,२२४.४९ कोटी रुपयांवर पोहोचले असून मागील सप्ताहापेक्षा त्यामध्ये २,१९,८४८.०६ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.nपरकीय वित्त संस्थांनी मे महिन्यात पहिल्या दोन दिवसांमध्ये बाजारात ११५६ कोटींची गुंतवणूक केली. एप्रिलमध्ये वित्तसंस्थांनी भारतीय बाजारातून रक्कम काढून घेतली होती. nभारतामध्ये निवडणुका सुरू असल्याने परकीय वित्त संस्थांनी थांबा आणि वाट बघा असे धोरण स्वीकारलेले दिसते. त्यामुळे त्यांचे गुंतवणुकीचे प्रमाण कमी झाले आहे. याचवेळी देशांतर्गत वित्त संस्था या बाजारात गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात रक्कम घेऊन तयार आहेत. परकीय वित्त संस्थांकडून होत असलेल्या विक्रीपेक्षा देशांतर्गत वित्त संस्थांची खरेदी जास्त राहिली.