Join us

सावरलेला बाजार पुन्हा घसरणार? कंपन्यांचे तिमाही निकाल, चीनचे जीडीपीवर बारकाईने लक्ष

By प्रसाद गो.जोशी | Published: October 14, 2024 11:18 AM

बाजारात आलेल्या मोठ्या करेक्शननंतर गतसप्ताहात बाजार काहीसा सावरला तरी अस्थिरता कायम राहण्याची चिन्हे आहेत.

बाजारात आलेल्या मोठ्या करेक्शननंतर गतसप्ताहात बाजार काहीसा सावरला तरी अस्थिरता कायम राहण्याची चिन्हे आहेत. येत्या सप्ताहात विविध कंपन्यांच्या तिमाहीचे निकाल, अमेरिकेतील वस्तू विक्री, युरोपमधील व्याजदर आणि चीनच्या जीडीपीची घोषणा यावर बाजाराची वाटचाल अवलंबून असेल. परकीय वित्तसंस्थांकडून होणाऱ्या खरेदी-विक्रीवरही बाजार बाराकाईने लक्ष ठेवून आहे.

गतसप्ताहात परकीय वित्तसंस्थांनी केलेल्या प्रचंड विक्रीमुळे प्रमुख निर्देशांक खाली आले तरी त्यांचा वेग कमी राहिला. मात्र, मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकांत वाढ झाली. त्यामुळेच बाजाराचे भांडवल मूल्यही वाढल्याचे दिसून आले आहे. सुरू असलेले युद्ध, कच्च्या तेलाचे दर व चीनच्या जीडीपीची घोषणा या महत्त्वाच्या घडामोडी असून, त्यावर बाजाराचे लक्ष आहे. 

भांडवल मूल्यामध्ये झाली वाढ

गतसप्ताहामध्ये बाजारात घसरण झाली असली तरी बाजाराचे भांडवल मूल्य वाढलेले दिसून आले आहे. सप्ताहाच्या अखेरीस बाजारातील सर्व कंपन्यांचे भांडवल मूल्य ४,६२,२७,९०१.६६ कोटी रुपयांवर आले आहे. मागील सप्ताहापेक्षा त्यामध्ये १,३८,३०३.१२ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या दरामध्ये वाढ झाल्याने ही वाढ झाली आहे.

परकीय वित्तसंस्थांच्या विक्रीमुळे दडपण

सप्टेंबरमध्ये ५७,७२४ कोटींची गुंतवणूक पऱकीय वित्तसंस्थांनी केली होती. आता चीनमध्ये जादा परतावा मिळू लागल्याने ऑक्टोबरमध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतातून पैसे काढण्यास प्रारंभ केला. ऑक्टोबरच्या १२ दिवसांमध्ये वित्तसंस्थांनी भारतीय शेअर बाजारातून ५८ हजार ७११ कोटी रुपये काढून घेतले आहेत.

टॅग्स :शेअर बाजारचीन