Join us

Wipro Bonus Shares : चौदाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज आयटी कंपनी; घोषणेनंतर शेअरमध्ये जोरदार तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 11:45 AM

Wipro Bonus Shares : कंपनीनं आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स वितरित करण्याची घोषणा केली आहे. कंपनी १:१ या प्रमाणात बोनस शेअरची घोषणा केली आहे.

Wipro Bonus Shares : आयटी कंपनी विप्रोच्या शेअर्समध्ये (Wipro Share Price) तुफान तेजी आली आहे. शुक्रवारी विप्रोचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ५५७.०५ रुपयांवर पोहोचला. कंपनीनं आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स वितरित करण्याची घोषणा केली आहे. विप्रोने १:१ या प्रमाणात बोनस शेअरची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक १ शेअरमागे १ बोनस शेअर देणार आहे. 

कंपनीनं बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाही. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना चौदाव्यांदा बोनस शेअर्स भेट देत आहे. विप्रोच्या शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ५८० रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ३७५ रुपये आहे.

१४ व्यांदा बोनस शेअर

आयटी कंपनी विप्रो आपल्या गुंतवणूकदारांना चौदाव्यांदा बोनस शेअर देत आहे. कंपनीनं १९७१, १९८१, १९८५, १९८७, १९८९, १९९२, १९९५, १९९७, २००४, २००५, २०१०, २०१७ आणि २०१९ या वर्षात बोनस शेअर्स दिले आहेत. गेल्या ३ वेळा देण्यात आलेल्या बोनस शेअर्सबद्दल बोलायचं झाले तर आयटी कंपनीनं जून २०१० मध्ये ३:२ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते. विप्रोनं जून २०१७ मध्ये १:१ या प्रमाणात बोनस शेअर्सचं वाटप केलं होतं. तर २०१९ मध्ये ३:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते.

३२०९ कोटींचा निव्वळ नफा

चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत विप्रोला ३२०९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झालाय. आयटी कंपनीच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत विप्रोला २,६४६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपनीचा एकत्रित महसूल १ टक्क्यांनी घसरून २२,३०२ कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत २२,५४३ कोटी रुपये होता. 

१६ वर्षांत जबरदस्त रिटर्न

आयटी कंपनी विप्रोच्या शेअर्सनं गेल्या १६ वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे. १० ऑक्टोबर २००८ रोजी कंपनीचा शेअर ५९.२८ रुपयांवर होता. जर एखाद्या व्यक्तीने १० ऑक्टोबर २००८ रोजी विप्रोचे शेअर्स १ लाख रुपयांना विकत घेतले असते तर त्याला १६८६ शेअर्स मिळाले असते. २००८ पासून विप्रोनं तीन वेळा बोनस शेअर्स गिफ्ट केले आहेत. विप्रोनं दिलेले बोनस शेअर्स जोडल्यास एकूण शेअर्सची संख्या ७४९३ वर पोहोचते. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी बीएसईवर विप्रोचा शेअर ५४५.३५ रुपयांवर व्यवहार करत होता. सध्याच्या किंमतीनुसार याचं मूल्य ४० लाखांच्या पुढे आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :विप्रोशेअर बाजार