RIL Share Price: रिलायन्स इंडस्ट्रीजने 20 लाख कोटी रुपयांची मार्केट कॅप असलेली पहिली भारतीय कंपनी बनून केवळ इतिहासच रचला नाही तर तिच्या गुंतवणूकदारांनाही श्रीमंत केलं आहे. जर एखाद्या गुंतवणूकदारानं ऑगस्ट 2005 मध्ये RIL च्या शेअर्समध्ये फक्त 10,000 रुपये गुंतवले असतील तर आज त्याची रक्कम 2.20 लाख रुपये झाली आहे.
आरआयएलचा प्रवास भारतीय शेअर बाजाराशी जवळून जोडलेला आहे. ही कंपनी धीरूभाई अंबानी यांनी 1966 मध्ये छोट्या टेक्सटाईल मॅन्युफॅक्चररच्या रुपात सुरू केली होती. रिलायन्सनं 1977 मध्ये आपल्या आयपीओद्वारे भारतात इक्विटी कल्चरची सुरुवात केली. कंपनीने पेट्रोकेमिकल्स, ऑईल अँड गॅस, रिटेल, दूरसंचार आणि वित्तीय सेवा क्षेत्रात पाऊल टाकलं आणि कंपनी मोठ्या समूहात बदलली. यामुळे शेअर होल्डर्सही कोट्यधीश झाले.
अडीच वर्षात ५ लाख कोटींची उडी
रिलायन्सचे मार्केट कॅप 2 ऑगस्ट 2005 रोजी पहिल्यांदा 1 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. त्याच दिवशी बीएसईनं 20 लाख कोटी रुपयांची मार्केट कॅपही ओलांडली. जुलै 2017 मध्ये 5 लाख कोटी, नोव्हेंबर 2019 मध्ये 10 लाख कोटी, सप्टेंबर 2021 मध्ये 15 लाख कोटी आणि 13 फेब्रुवारी 2024 रोजी मुकेश अंबानींच्या या कंपनीनेही 20 लाख कोटींचा पल्ला गाठला.
शेअर प्राईज हिस्ट्री
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सनं आतापर्यंत 5420 टक्के परतावा दिला आहे. 5 जुलै 2002 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत केवळ 53.01 रुपये होती, जी 13 फेब्रुवारी 2024 पर्यंत 2926.20 रुपयांवर पोहोचली. तेव्हापासून त्यात आपले पैसे गुंतवून संयम बाळगणारे गुंतवणूकदार श्रीमंत झाले आहेत. 5 ऑगस्ट 2005 रोजी शेअर 146.12 रुपयांवर पोहोचला. 30 मे 2014 रोजी या स्टॉकची किंमत 546 रुपये होती. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 2958 रुपये आहे, तर नीचांकी स्तर 2180 रुपये आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)