Dividend Stock: शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केलंय. तर असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचं नुकसानही केलं. दरम्यान, वंडर इलेक्ट्रिकल्स लिमिटेड नावाच्या एका शेअरनं स्टॉक स्प्लिटची घोषणा केलीये.
१० भागांत होणार स्प्लिट
कंपनीनं २२ ऑगस्ट रोजी शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरची १० भागांमध्ये विभागणी करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. या शेअर स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू १ रुपयापर्यंत खाली येईल. कंपनीनं अद्याप या शेअर स्प्लिटची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. पण येत्या काळात कंपनी ही तारीख जाहीर करू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शुकवारी शेअरमध्ये घसरण
शुक्रवारी कंपनीचा शेअर १६१७.८५ रुपयांच्या पातळीवर उघडला, जी किंमत गुरुवारच्या बंदच्या तुलनेत अधिक होती. तर, कंपनीच्या शेअर्सनं इंट्रा-डे १६२० रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला. कंपनीचा हा ५२ आठवड्यांतील उच्चांक आहे. मात्र, ही पातळी गाठल्यानंतर कंपनीचा शेअर ११.७५ टक्क्यांनी घसरून ११४९.६५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. शुक्रवारी शेअर १४६४.५५ रुपयांच्या पातळीवर बंद झाला.
कंपनीची कामगिरी कशी?
गेल्या वर्षभरात वंडर इलेक्ट्रिकल्सच्या शेअर्सच्या किमतीत ५२९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर ज्या गुंतवणूकदारांनी ६ महिने शेअर ठेवला आहे, त्यांना आतापर्यंत २९४ टक्के नफा झाला आहे. गेल्या महिनाभरात या शेअरमध्ये १७ टक्क्यांची वाढ झालीये.
पुढील महिन्यात कंपनी एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून व्यवहार करणार आहे. कंपनी एका शेअरवर १ रुपयाचा लाभांश देत आहे. कंपनीचे शेअर्स १८ सप्टेंबर रोजी एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून व्यवहार करतील. कंपनी पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर एक रुपया लाभांश देईल.
(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)