smallcap, midcap investors : सप्टेंबर २०२४ मध्ये भारतीय शेअर बाजार ऑल टाईम हायवर होता. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही विक्रम करत होते. मात्र, त्यानंतर एखाद्याची नजर लागावी तशी बाजारात घसरण सुरू आहे. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. परकीय गुंतवणूकदारांची विक्री, ट्रम्प यांचा टॅरिफचा इशारा, कंपन्यांचे तिमाही निकाल या सर्वांचा परिणाम बाजाराला आणखी खाली घेऊन जात आहेत. स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना रडकुंडीला आणलं आहे. फेब्रुवारी महिना शेअर बाजारासाठी भयंकर घसरणीचा ठरला आहे. ही परिस्थिती कधी सुधारणार? असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे.
मार्च २०२० नंतर, स्मॉल आणि मिड कॅप शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण गेल्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये नोंदवली गेली आहे. यामुळे किरकोळ गुंतवणूकदार चिंतेत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे बाजारात पॅनिक सेलिंग झाली. जर आपण बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स पाहिला तर फेब्रुवारीमध्ये त्यात १४ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याचवेळी निफ्टीचा मिडकॅप १०० निर्देशांकही १०.८ टक्क्यांनी घसरला आहे.
स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्सची स्थितीकेवळ एका महिन्यात, बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकात समाविष्ट केलेल्या ९३८ शेअर्सपैकी ३२१ स्टॉक्स असे आहेत, ज्यामध्ये २० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. तर निफ्टी मिडकॅप १०० इंडेक्सने २१ मार्च २०२४ नंतर नवीन नीचांक गाठला आहे. कमकुवत जागतिक बाजार, जागतिक स्तरावर राजकीय अस्थिरता आणि स्मॉल आणि मिडकॅप समभागांमध्ये तरलतेची समस्या यामुळे बाजार नवीन नीचांकी पातळीवर आला आहे.
शेअर बाजारात स्थिती कधी सुधारेल?स्मॉल आणि मिडकॅप सेगमेंटमध्ये सध्या घसरणीचा ट्रेंड दिसत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी काय करावं? विक्री करावी की होल्ड करावे? याबाबत आयसीआयसीआय डायरेक्टचे टेक्निकल रिसर्च हेड धर्मेश शाह सांगतात की, गेल्या २ दशकांत स्मॉल आणि मिडकॅप मार्केटमध्ये जेव्हाही सुधारणा झाली आहे, तेव्हा ती २५ ते ३० टक्के झाली आहे, त्यानंतर मार्केट बाउन्स बॅक झाले आहे. येत्या काही दिवसांत आणखी घसरण होईल की नाही याबाबत स्पष्टपणे काहीही सांगता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे, परंतु ऐतिहासिक आकडेवारी पाहता बाजार तळ गाठण्याच्या जवळ असल्याचे दिसते.
(Disclaimer- यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)