Yatharth Hospital IPO Listing: यथार्थ हॉस्पिटल अँड ट्रॉमा केअरच्या शेअर्सचं शेअर बाजारात सुस्त लिस्टिंग झालं. या हॉस्पिटलच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. आयपीओ ३०० रुपयांवर इश्यू करण्यात आला होता. परंतु बीएसई-एनएसईवर याची एन्ट्री ३०४ रुपयांवर झाली. आयपीओच्या गुंतवणूकदारांना काही विशेष लिस्टिंग गेन मिळाला नाही. परंतु नंतर कामकाजादरम्यान हा शेअर ३३० रुपयांपर्यंत पोहोचला. गुंतवणूकदारांना या शेअरवर १०.३० टक्क्यांचा नफा झाला.
मिळाला होता जबरदस्त प्रतिसाद
यथार्थ हॉस्पिटलचा ६७६.७ कोटी रूपयांचा आयपीओ २६ ते २८ जुलैदरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला होता. या इश्यूला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा आयपीओ ३७.२८ पट सबस्क्राईब झाला होता. यातील क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा ८६.३७ पट, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा हिस्सा ३८.६२ पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा ८.६६ पट सबस्क्राईब झालेला.
२००८ मध्ये सुरुवात
यथार्थ हॉस्पिटल अँड ट्रॉमा केअर सर्व्हिसेस, एक मल्टी-केअर हॉस्पिटल चेन कंपनी, २००८ मध्ये सुरू करण्यात आली. दिल्ली-एनसीआरमधील टॉप-१० खासगी रुग्णालयांमध्ये त्यांचा समावेश आहे. त्यांची दिल्ली-एनसीआरमध्ये ३ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत, जी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि नोएडा एक्स्टेंशनमध्ये आहेत. नोएडा एक्स्टेंशन हॉस्पिटलमध्ये ४५० बेड्स आहेत. अजय कुमार त्यागी आणि कपिल कुमार हे या कंपनीचे प्रवर्तक आहेत.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)