Yatharth Hospital IPO: यथार्थ हॉस्पिटलचा आयपीओ (Yatharth Hospital IPO) आजपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. यामध्ये 28 जुलैपर्यंत सबस्क्राइब करता येईल. आयपीओ उघडण्यापूर्वी, कंपनीनं 18 अँकर गुंतवणूकदारांकडून सुमारे 206 कोटी रुपये उभे केले. या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची की नाही असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहे. अशा परिस्थितीत या आयपीओबाबत आघाडीच्या ब्रोकरेज फर्मचं काय मत आहे हे जाणून घेऊ.
काय दिलाय सल्ला?
बहुतांश ब्रोकरेज कंपन्यांनी या IPO ला सबस्क्राईब करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीची मजबूत आर्थिक स्थिती आणि उत्तर भारतातील वाढीची शक्यता लक्षात घेता, ब्रोकरेजनं सबस्क्राईब करण्याचा सल्ला दिलाय.
रिलायन्स सिक्युरिटीजनंदेखील या इश्यूला सबस्क्राइब रेटिंग दिलंय. मारवाडी फायनान्शिअल सर्व्हिसेसने म्हटलेय की, रुग्णालयाचं ऑपरेटिंग आणि आर्थिक कामगिरी स्थिर आहे. हा IPO स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत अधिक व्हॅल्युएशनसह उपलब्ध आहे.
आयपीओबाबत माहिती
कंपनीनं आपल्या आयपीओसाठी 285 रुपये ते 300 रुपये प्रति इक्विटी शेअरचा प्राइस बँड निश्चित केला आहे. अँकर गुंतवणूकदारांचा यात मंगळवारपासून म्हणजेच 25 जुलैपासून अर्ज करता येणार होता. या इश्यू अंतर्गत, कंपनीचे विद्यमान प्रवर्तक आणि भागधारक 6,551,690 शेअर्स ऑफर करतील.
या दिवशी होणार लिस्टिंग
2 ऑगस्ट 2023 रोजी शेअर्सचं वाटप होईल. 3 ऑगस्ट 2023 पासून रिफंड इश्यू सुरू होईल. यथार्थ हॉस्पिटलचे शेअर्स पात्र गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात 4 ऑगस्टपर्यंत जमा केले जातील. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग 7 ऑगस्टपर्यंत करता येईल. प्रत्येक इक्विटी शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये प्रति इक्विटी शेअर इतकी निश्चित करण्यात आलीये. कंपनीने किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के इश्यू राखून ठेवला आहे. त्याच वेळी, 50 टक्के शेअर्स क्युआयबीसाठी म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स आणि 15 टक्के एनआयआय किंवा एचएनआयसाठी राखीव ठेवण्यात आलेत.
2009 मध्ये सुरुवात
यथार्थ हॉस्पिटल अँड ट्रॉमा केअर सर्व्हिसेस, एक मल्टी-केअर हॉस्पिटल चेन कंपनी, 2008 मध्ये सुरू करण्यात आली. दिल्ली-एनसीआरमधील टॉप-10 खासगी रुग्णालयांमध्ये त्यांचा समावेश आहे. त्यांची दिल्ली-एनसीआरमध्ये 3 मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत, जी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि नोएडा एक्स्टेंशनमध्ये आहेत. नोएडा एक्स्टेंशन हॉस्पिटलमध्ये 450 बेड्स आहेत.
या आयपीओ अंतर्गत, कंपनी 490 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करेल. याद्वारे कंपनी एकूण 686.55 कोटी रुपये उभारणार आहे. अजय कुमार त्यागी आणि कपिल कुमार हे या कंपनीचे प्रवर्तक आहेत.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. ब्रोकरेज फर्मचे विचार हे त्यांचे वैयक्तिक विचार आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)