Lokmat Money >शेअर बाजार > आपल्या बचतीनेच दिली शेअर बाजाराला उंची; सर्व श्रेय भारतीय गुंतवणूकदारांचं

आपल्या बचतीनेच दिली शेअर बाजाराला उंची; सर्व श्रेय भारतीय गुंतवणूकदारांचं

विदेशी गुंतवणूकदारांनी रक्कम काढली असली तरी भारतीय गुंतवणूकदारांनी मोठी रक्कम गुंतवून बाजार स्थिर ठेवला आहे. 

By पुष्कर कुलकर्णी | Published: December 4, 2022 05:37 AM2022-12-04T05:37:21+5:302022-12-04T05:37:53+5:30

विदेशी गुंतवणूकदारांनी रक्कम काढली असली तरी भारतीय गुंतवणूकदारांनी मोठी रक्कम गुंतवून बाजार स्थिर ठेवला आहे. 

Your savings gave height to the Share Market; All credit to Indian investors | आपल्या बचतीनेच दिली शेअर बाजाराला उंची; सर्व श्रेय भारतीय गुंतवणूकदारांचं

आपल्या बचतीनेच दिली शेअर बाजाराला उंची; सर्व श्रेय भारतीय गुंतवणूकदारांचं

डॉ. पुष्कर कुलकर्णी 

कोरोना पश्चात जागतिक मंदीचे सावट पुन्हा डोके वर काढत असताना भारतीय शेअर बाजार मात्र स्वसामर्थ्याने नुसतेच तग धरून नाहीत तर नव्या उंचीवर विराजमान झाले आहेत. निफ्टी ५० इंडेक्स तसेच सेन्सेक्सने गेल्या आठवड्यात बाजाराची नवी उंची गुंतवणूकदारांना दाखविली. याचे सर्व श्रेय भारतीय गुंतवणूकदारांना जाते. भारतीय शेअर बाजार भारतीय गुंतवणूकदारच सावरत आहेत, ही फार मोठी अभिमानाची बाब आहे. आता आपले बाजार परकीय गुंतवणूकदारांच्या प्रभावाखाली फार अस्थिर राहणार नाहीत अशी सुरुवात नक्कीच होत आहे, असे म्हणणे अनुचित होणार नाही. 

परकीय आणि भारतीय गुंतवणूकदार यांची रस्सीखेच : भारतीय शेअर बाजारात परकीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात आहेत. विविध इंडेक्स फंडस् आणि इक्विटीमध्ये त्याची गुंतवणूक लाखो कोटींमध्ये आहे. याचबरोबर भारतीय वित्तीय संस्था सुद्धा शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवीत असतात. जेव्हा-जेव्हा परकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारातून रक्कम काढून घेत होते तेव्हा-तेव्हा बाजार खाली आलेला आपण अनुभवला आहे. परंतु यास हे वर्ष मात्र अपवाद आहे. परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात रक्कम काढून सुद्धा भारतीय गुंतवणूकदारांनी तितक्याच मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवून बाजार स्थिर ठेवला आहे.

भवितव्य काय?
नजीकच्या भविष्यात जरी बाजाराने मोठे करेक्शन दाखविले तरीसुद्धा दीर्घ काळाचा विचार करता भारतीय बाजार वाढणार. याचे कारण बाजारातील वाढती गुंतवणूक आणि गुंतवणूकदार. जसे भारतात परकीय गुंतवणूकदारांचे महत्त्व आहे तसेच महत्त्व भारतीय गुंतवणूकदार जगातील सर्व महत्त्वाच्या शेअर बाजारात दाखवून देतील, यात शंका नसावी. 

गुंतवणूकदारांचा विजय असो...
कोरोना पश्चात भारतीय गुंतवणूकदार बाजारात अधिक प्रमाणात सरसावले आहेत. परकीय संस्थांनी मागील दोन वर्षांत तब्बल २ लाख ९० हजार कोटी रुपये भारतीय बाजारातून काढले आणि त्याच दरम्यान भारतीय गुंतवणूकदारांनी तब्बल ३ लाख १० हजार कोटी रुपये गुंतविले आहेत. 

साखरेचा डबा ते म्युचुअल फंडस् 
चहा साखरेच्या डब्यात नोटा ठेवणे, दिसणार नाही, अशा कोपऱ्यात किंवा कपाटात पेपरखाली पैसे ठेवणे ही सवय महिलांमध्ये असते. उद्देश एकच की बाजूला काढून ठेवलेली रक्कम भविष्यात अडचणीत उपयोगी पडेल. हीच सवय रिकरिंग ठेव, पोस्टामधील गुंतवणूक या माध्यमातून पुढे म्युचुअल फंड्सच्या माध्यमातून जडून आहे. 

डिमॅट अकाउंट- धारकांमध्ये तिप्पट वाढ 
२०१८-१९ मध्ये भारतात डिमॅट धारकांची संख्या ३.५० लाखांच्या घरात होती. २०२१-२२ मध्ये हीच संख्या १० कोटींच्या वर गेली आहे. म्हणजेच तिपटीने वाढली आहे. याचाच अर्थ असा की, शेअर बाजारात व म्युचुअल फंडसमध्ये गुंतवणुकीचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

असा वाढला बाजार 

२००८ : मंदीचा फटका भारतीय शेअर बाजारास बसला होता. निफ्टी ५० इंडेक्स नोव्हेंबर २००८ मध्ये २५०३ या नीचांकी पातळीवर आला होता. याच दरम्यान भारतीय गुंतवणूकदारांनी बाजारात आपला हिस्सा वाढविला 

डिसेंबर २०११ : निफ्टी ५० इंडेक्स ५२०२ या उच्चतम पातळीवर गेला. 

२०१२ ते २०१५ : परकीय गुंतवणूकदारांनी मोठी रक्कम भारतीय बाजारात गुंतविली. यामुळे निफ्टीने मार्च २०१५ मध्ये ९११९ ही उच्चतम पातळी गाठली. 

२०१६ ते २०१९ : भारतीय गुंतवणूकदारांनी मोठी रक्कम बाजारात गुंतविली. निफ्टीने कोरोना पूर्वी १२ हजारच्यावर मजल मारली खरी; पण कोरोनामध्ये बाजाराने पुन्हा एकदा लोटांगण घातले. त्यातून सावरून बाजाराने आजपर्यंत मात्र मागे वळून पहिले नाही. 

२०२२ : गेल्या आठवड्यात बाजाराने नवी उंची गाठली व निफ्टी १९०००च्या उंबरठ्यावर आला

(नोव्हेंबरपर्यंत)
कालावधी    परकीय गुंतवणूकदार  भारतीय गुंतवणूकदार
२००८-११  ४२ हजार कोटी काढले    १ लाख ९ हजार कोटी घातले  
२०१२-१५ २ लाख ३५ हजार कोटी घातले  ९० हजार कोटी काढले
२०१६-२० ८८ हजार कोटी काढले  २ लाख ७८ हजार कोटी घातले
२०२१-२२ २ लाख ९० हजार कोटी काढले३ लाख १० हजार कोटी घातले

 

(लेखक शेअर बाजार अभ्यासक आहेत)

 

Web Title: Your savings gave height to the Share Market; All credit to Indian investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.